For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्य सेन, सात्विक-चिरागसाठी कठीण ड्रॉ

06:00 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य सेन  सात्विक चिरागसाठी कठीण ड्रॉ
Advertisement

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा : प्रणॉयसमोरही कडवे आव्हान :  सिंधूकडून दमदार कामगिरीची अपेक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बुधवारी पॅरिसमध्ये 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ड्रॉ जाहीर केला. या स्पर्धेत सात भारतीय खेळाडू मैदानात आहेत. तथापि, पुरुष एकेरीत भारताची आशास्थान असलेल्या लक्ष्य सेनला एचएस प्रणॉयसह कठीण ड्रॉ मिळाला आहे. लक्ष्यचा सामना अव्वलमानांकित चीनच्या शी युकीशी होणार आहे. याशिवाय, महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागवर भारताची मदार असणार असेल.

Advertisement

एकेरीतील दुसरा खेळाडू एचएस प्रणॉयला पहिल्या फेरीत फिनलँडच्या जोकिम ओल्डॉर्फ या दुबळ्या प्रतिस्पर्ध्याशी खेळायचे आहे. अर्थात, हा अडथळा पार केल्यावर दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनचे आव्हान असू शकते. याशिवाय, लक्ष्यसमोर देखील कठीण आव्हान असणार आहे. अलीकडील काळातील लक्ष्यची कामगिरी पाहता चीनच्या शी युकीला तो कडवी टक्कर देऊ शकतो.

सात्विक-चिरागवर मदार

पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग शेट्टी जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्या हरिहरन-रुबेन कुमार किंवा तैवानच्या लिऊ कुआंग हेंग-यांग पो हान यांच्यातील विजेत्याशी होईल. भारतीय जोडीची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्या आरोन चिया-सोह वुई यिक यांचे आव्हान असू शकते. अर्थात, आतापर्यंत भारतीय जोडीने या जोडीविरुद्ध झालेल्या 14 पैकी 11 लढतींत विजय मिळविला आहे.

सिंधूकडूनही अपेक्षा

महिला एकेरीत पीव्ही सिंधूलादेखील पहिल्या फेरीत आव्हान नसेल. तिची गाठ बल्गेरियाच्या कालोयाना नालबांटोवाविरुद्ध होईल. पण, दुसऱ्या फेरीत तिला जागतिक क्रमवारीतील चीनची दिग्गज खेळाडू वांग झी यी हिचे आव्हान अपेक्षित आहे. मागील काही काळापासून सिंधूला एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या वर्षातील तिचा खराब फॉर्म पाहता चीनच्या वांग झीविरुद्ध तिला सरस खेळ करावा लागणार, हे मात्र निश्चित आहे.

Advertisement
Tags :

.