हजारो किलोमीटरवरुन करा स्पर्श
सध्याचे युग दूरनियंत्रणाचे किंवा रिमोट कंट्रोलचे आहे. विशेषत: वैद्यकीय उपचार क्षेत्रात ऑन लाईन किंवा दूरनियंत्रणाचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शस्त्रक्रियाही दूरनियंत्रित पद्धतीने करता येतील असे तंत्रज्ञान विकसीत केले जात आहे. तथापि, रुग्णाला केवळ औषधोपचारांची किंवा शस्त्रक्रियांची आवश्यकता नसते. तर त्याला आजारीपणात त्याच्या निकटवर्तीयांचे सान्निध्य आणि त्यांचा स्पर्शही हवा असतो. असे सान्निध्य आणि स्पर्श त्याला लवकर बरे करण्यासाठी साहाय्यभूत ठरतात. कारण त्याला ते मानसिक आधार देतात.
तथापि, सध्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञाची मर्यादा अशी आहे, की रुग्णाचे अशा प्रकारे भावनिक समाधान या तंत्रज्ञानाचा आधारे करता येत नाहीत. पण आता ही त्रुटी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक हेल्गे वुर्डेमन यांनी असे एक साधन शोधल्याचे प्रतिपादन केले आहे, की जे आपल्याला आपल्या निकटवर्तीयांच्या किंवा नातेवाईकांचा स्पर्श हजारो किलोमीटर अंतरावरुन घडवून आणू शकेल. तशा प्रकारचा एक हातमोजा निर्माण करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. या हातमोज्याला अनेक ‘बोटे’ असतील. असे तंत्रज्ञान शोधण्यात त्यांना यश आले आहे. या तंत्रज्ञानाला ‘बायो इन्स्पायर्ड हेप्टिक सिस्टिम’ (बीएएमएच ) अशी संज्ञा देण्यात आली आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्पर्शाची प्रतिकृती (सिम्युलेशन) या तंत्रज्ञानाचा आधारे करण्यात येऊ शकते, जेणेकरुन रुग्ण किंवा स्पर्शासाठी आसुललेल्या व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांच्या स्पर्शाचे समाधान मिळू शकेल. अर्थात, हे तंत्रज्ञान अद्याप संकल्पनेच्या अवस्थेत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली, तर या तंत्रज्ञानाचा असंख्य प्रकारे उपयोग केला जाऊ शकेल, असा वुर्डेमन यांचा ठाम विश्वास आहे.