For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत ‘48 डिग्री’चा टॉर्चर

06:25 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत ‘48 डिग्री’चा टॉर्चर
Advertisement

किमान तापमानही 30 अंशापार : आणखी तीन दिवस उष्मालाट राहण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली समवेत उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या तीव्र उष्मालाटेला तोंड देत आहेत. उष्णता अत्यंत अधिक असल्याने लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड ठरले आहे. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये आगामी 3 दिवसांपर्यंत तीव्र उष्मालाटेचा प्रकोप राहण्याचा इशारा दिला आहे. यादरम्यान कमाल तापमान 48 अंशापर्यंत पोहोचू शकते. तर चालू आठवड्यात दुपारच्या वेळेसोबत दिल्लीतील रात्रीही उष्ण राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी किमान तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

Advertisement

दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये सोमवारी कमाल तापमान 48.8 अंश इतके नोंद झाले आहे. नजफगडमध्ये 48.6 अंश, नरेलामध्ये 48.4 अंश, पीतमपुरामध्ये 47.6 अंश तापमान नोंदविले गेले. हवामान विभागानुसार चालू आठवड्यात दिल्लीचे कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर 31 मे रोजी दिल्लीतील हवामानाचे स्वरुप बदलण्याची शक्यता आहे. 31 मे आणि 1 जून रोजी दिल्लीत पाऊस पडू शकतो. या पावसामुळे दिल्लीवासीयांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही, कारण पावसानंतरही तापमानात घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचे सांगणे आहे.

नजीकच्या भागातही उष्मालाट

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये हवामान विभागाने 29 मेपर्यंत उष्मालाटेचा अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान नोएडामध्ये कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहोचू शकते. गाझियाबादमध्ये देखील चालू आठवड्यात कमाल तापमान 40-45 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर गुरुग्राममध्ये कमाल तापमान 47 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सीमेवर बीएसएफ जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू

राजस्थानात जीवघेण्या ठरणाऱ्या उष्णतेत उष्माघातामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील जैसलमेर जिल्ह्यात तैनात बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला आहे. सीमेवर उष्माघातामुळे मृत्यू झालेला जवान अजय कुमार हे पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रहिवासी होता. रविवारी जवान अजय यांची प्रकृती अचानक बिघडली आणि काही वेळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी उत्तरीय तपासणी करण्यात आली असता मृत्यूचे कारण उष्माघात मानले जातेय. जैसलमेरमध्ये रविवारी 48.5 अंश तापमानाची नोंद झाली होती. तर जैसलमेरला लागून असलेल्या फलौदीमध्ये तापमान 49.8 अंश तर बाडमेरमध्ये 49 अंश राहिले आहे. राजस्थानात उष्मालाटेमुळे आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.

Advertisement
Tags :

.