For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॉप टेन करिअर ऑप्शन्स

06:33 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
टॉप टेन करिअर ऑप्शन्स
Advertisement

10 वी 12 वी नंतर पुढे काय? याचा विचार रिझल्ट लागल्यावर करू किंवा नंतर कधीतरी असं मनाशी योजत असाल तर आताच जागे व्हा. अनेकांचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. अशावेळी करिअरकरीता असंख्य पर्यायातून एकाची निवड करायची म्हणजे तारेवरची कसरत असते. येत्या काही वर्षात कोणत्या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होतील याचा अंदाज घेऊन आत्ताच तशी आखणी करायला हवी. त्यासाठी यावर्षीचे टॉप टेन पर्याय कोणते आहेत हे पाहुया.

Advertisement

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा संपल्यावर एक अध्याय संपला आहे. त्यामुळे वर्षभर अभ्यासाचे, चांगल्या गुणांचे जे काही ओझे हेते ते आता काहीसे कमी झाले आहे. ही मंडळी या परीक्षेच्या तणावातून जरा कुठे हुश्य करत आहेत की त्यांच्यासमोर 10 वी, 12 वी नंतर पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा राहतो. सुट्टीत या पर्यायाचा विचार करायलाच हवा, नाहीतर निकाल हाती आल्यावर कुठल्या साईडला अॅडमिशन घ्यायची हा निर्णय पटकन घेता येऊ शकत नाही. या सुट्टीचा उपयोग खरं तर मुलांनी 10 वी किंवा 12 नंतर कोणत्या शाखांना प्रवेश घेता येईल, त्यातली आपली आवड किती आणि त्याच्या भविष्यातील संधी किती यावर विचार करण्यात करून घ्यायला हवा. आज पूर्वीसारखे कॉमर्स, आर्टस् किंवा सायन्स असे मर्यादित पर्याय नाहीत, तुम्हाला आवड असलेल्या कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची संधी आता छोट्या मोठ्या कोर्समुळे सहज उपलब्ध होऊ शकते. मग एखाद्याला छोटासा कोर्स करून लगेच नोकरी-व्यवसायाला सुरूवात करायची असेल तरी त्याला ते शक्य आहे किंवा एखाद्याला पारंपारिक शिक्षणपध्दतीत राहून पदवी किंवा उच्च शिक्षण घ्यायचं असेल तरी तो ते साध्य करू शकतो. या वर्षी कोणत्या शैक्षणिक पर्यायांना जास्त मागणी राहणार आहे यावर एक नजर टाकूया. टॉप टेन करियर पर्याय कोणते आहेत याची एक झलकच पाहूया.

पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी- हा एक आकर्षक पर्याय असून त्यात कारकिर्द घडवण्याची चांगली संधी भारतात उपलब्ध होत आहे. भारत पर्यटनासाठी आकर्षण ठरत आहेच पण भारतीय लोकही आता निरनिराळ्या देशात जाण्यासाठी उत्सुक असल्याने या क्षेत्रात चांगली कारकिर्द घडवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. 10 वी किंवा 12 वी दोन्ही नंतर यात एक ते दोन वर्षाचे कोर्सेस उपलब्ध असून सर्व मान्यताप्राप्त विद्यापिठात ते उपलब्ध आहेत. शिवाय अनेक नामांकित पर्यटन संस्थाही स्वत:चे कोर्सेस चालवतात, त्यांच्याकडे कामाचा अनुभव घेऊनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात करता येते. मात्र त्यासाठी पर्यटनाची आवड आणि लोकसंपर्क या दोन मुख्य गुणांचा कस लागतो. त्याची मात्र तयारी हवी.

Advertisement

शिक्षण व्यवसाय- शिकवण्याची जर तुम्हाला मनापासून आवड असेल तर शिक्षकी पेशाकडेही तुम्ही कारकिर्द म्हणून पाहू शकता. आज शिक्षण व्यवसायाचा चेहरामोहरा खासगीकरणाने अमुलाग्र बदलला आहे. अनेक कंपन्या यात प्रोफेशनल दृष्टीकोन घेऊन उतरल्या आहेत. शिक्षकी पेशा आता पारंपारिक न राहता त्याला आधुनिक तंत्राची जोड मिळाली आहे. त्यामुळे शिकवणं ही तुमची पॅशन असेल तर या  पर्यायाकडेही तुम्ही गांभीर्याने पाहू शकता. बी.एड., एम.एड अशा पारंपरिक योग्यतेबरोबरच तुम्ही एखाद्या विषयातील खास प्रशिक्षण देणारे शिक्षक म्हणूनही काम करू शकता.

हेल्थ केअर- डॉक्टर किंवा नर्स अगर एखाद्या विषयातील स्पेशलायझेशन जसे की, दंतवैद्य, स्त्राrरोग, बालरोग किंवा कॅन्सर अशा विषयातील प्राविण्य तुम्हाला एका चांगल्या कारकिर्दीची संधी देईल यात शंकाच नाही. कोविडोत्तर काळात वैद्यक शास्त्राचा आवाका कितीतरी पट वाढला आहे. आज शरीराच्या प्रत्येक अवयवयासाठी एक स्पेशालिस्ट असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. याशिवाय रेडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, पॅरामॅडिकल सायंटिस्ट अशा कित्येकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफची मागणीही वाढत आहे. भारतात गेली काही वर्षें मेडिकल टूरिझमची क्रेझही वाढत आहे. त्या सगळ्यांमुळे मेडिकल क्षेत्राला येणारी मागणी वाढणारच आहे. पण ही मागणी केवळ डॉक्टर आणि संबंधित क्षेत्रापुरती नसून त्याच्याशी निगडीत अन्य सेवाक्षेत्रातही आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी जरूर लक्ष द्यावे.

आय.टी- इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे आजच्या आणि उद्याच्या काळातील बूमिंग करिअरक्षेत्र आहे. या क्षेत्रात असंख्य नव्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रोफेशनल्सना वाढती मागणी हे एक कारण आहेच; पण यातील जाणकारांच्या मते गेमिंग टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ऑग्मेंटेड रिअॅलिटी  यात मागणी वाढणार आहे. याच क्षेत्राशी निगडीत असलेल्या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. त्यामुळे आय.टी. हे क्षेत्रही विद्यार्थ्यांचं हॉट फेव्हरिट राहणार यात शंका नाही.

बँकिंग आणि फायनान्स- हे क्षेत्र नेहमीच मागणी असणारं क्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे. त्यात सी.ए. आणि आय.सी.डब्लू.ए. याकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहेच. त्याचा फायदा त्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी होत आहे. सरकारी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्या तरी खासगी आणि सार्वजनिक  क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होत आहेत. भारतात रिटेल बँकिंगलाही मोठी मागणी आहे. याशिवाय इन्शुरन्स क्षेत्रही झपाट्याने विस्तारत आहे. त्यातही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी दहावीनंतर कॉमर्स शाखा निवडणे किंवा 12 वी नंतर सी.ए. किंवा सी.एस. च्या फाउंडेशन परीक्षांची तयारी करणे यासारखे पर्याय असू शकतात.

कन्स्ट्रक्शन- येत्या काही काळात सर्वात जास्त मागणी येणारे क्षेत्र म्हणून कन्स्ट्रक्शनचा उल्लेख करावा लागेल. इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग याशिवाय मार्केटिंग प्रोफेशनल, आर्किटेक्चर आणि प्रोजेक्ट मॅनेजर अशा कितीतरी संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. रिटेलशी जोडलं गेल्यामुळे या क्षेत्राला भरपूर मागणी आहे. त्यादृष्टीनेही कन्स्ट्रक्शन क्षेत्र भरभराटीला येत आहे.

मॅनेजमेंट- कन्स्ट्रक्शन, रिटेल आणि आय.टी. मध्ये येणारी भरभराट मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना फायद्याची ठरणार आहे. त्यातही मार्केटिंग आणि फायनान्स क्षेत्रात मॅनेजमेंटचा दबदबा कायम राहिल असं जाणकार सांगतात. त्यादृष्टीने प्रयत्न करायचे असल्यास मॅनेजमेंटचे कोर्स करणं गरजेचं आहे. आजकाल हे कोर्सेस 12 वी नंतरही उपलब्ध आहेत. त्यात सर्टिफिकेटपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणालाही मोठी मागणी आहे.

पब्लिक रिलेशन अॅन्ड इव्हेंट मॅनेजमेंट-  कॉर्पोरेट कंपन्यांच्या खास बातम्या प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहचवणं आणि त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करून देणं या दोन्ही गोष्टींना आजच्या काळात भरपूर मागणी आहे. संबंधित कोर्सची उपलब्धताही भरपूर आहे. त्यातील पदवीपेक्षाही तुमच्याकडे भाषेवर प्रभुत्व आणि लेखनाची कला अवगत असेल तर या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात.

अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी- गेल्या काही वर्षात शेतीत नव तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रयोगांनी अनेकांचे आयुष्य समृध्द केले आहे. शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी हा चांगला पर्याय होऊ शकतो. सायन्स विषय शिकणाऱ्यांसाठी बरेच पर्याय आहेत. बी.टेक, एम.टेक किंवा फूड टेक्नॉलॉजी यासारख्या पर्यायांचाही विचार केला जाऊ शकतो. मेडिकल क्रॉप्स आणि फार्मिंगसाठी अॅग्रीकल्चर इंजिनिअर्सची मदत घेतली जाऊ शकते.

एव्हिएशन इंडस्ट्री- वैमानिक आणि तत्सम सेवा यामध्येही करियरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. केवळ वैमानिक म्हणून नाही तर केबिन क्रु, ग्राउंड स्टाफ आणि फ्लाईट डिस्पॅच ऑफिसर म्हणूनही कारकिर्द घडवण्याची चांगली संधी आहे. खासगीकरणाने या क्षेsत्रातही रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

कारकिर्दीची क्षेत्रे अमर्यादित आहेत. तुमची आवड आणि कारकिर्दीची निवड यांची सांगड घालता आली तर तुमच्यासाठी ‘स्काय इज लिमिट’ ठरेल. त्यामुळे आपल्या कारकिर्दीची निवड योग्य प्रकारे करा. आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे याची मनाशी खात्री करा आणि त्यासंबंधी अधिकाधिक माहिती गोळा करण्यासाठी या सुट्टीचा उपयोग करून घ्या.

- स्वाती वाळिंबे

Advertisement
Tags :

.