हेल्मेट काढले अन् गमावला जीव
दुचाकीवरील ताबा सुटल्याने पती ठार : क्षणभर हेल्मेट घातलेली पत्नी बचावली
फोंडा : आपल्या पत्नीसमवेत मूळगावी गदग-कर्नाटक येथे जात असताना नंद्रण मोले येथे दुचाकीच्या झालेल्या स्वयंअपघातात पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळी उघडकीस आली. शेकप्पा उर्फ अशोक पुजारी (55, मूळ गदग, कर्नाटक सध्या रा. कांदोळी बार्देश) असे मयताचे नाव आहे. मोले चेकपोस्टनंतर सुमारे 3 किलोमीटर अंतरावर अनमोड घाट रस्त्यावर हा अपघात घडला. पाठिमागे बसलेल्या पत्नीने हेल्मेट परिधान केल्याने ती सुखरूप बचावली. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेकप्पा हा आपल्या स्कूटरवरून पत्नीला पाठिमागे बसवून आपल्या मूळ गावी जात होता.
मोले येथील चेकपोस्ट पार केल्यानंतर अनमोड घाट रस्त्यावर नंद्रण मोले येथे डोक्यावर घातलेले हेल्मेट काढून त्याने पाठिमागे बसलेल्या पत्नीकडे धरायला दिले. पत्नीने वळणावरील रस्त्यात हातात धरायला त्रास म्हणून हेल्मेट आपल्या डोक्यावर घातले. काही अंतर पुढे गेल्यानंतर शेकप्पाचा दुचाकीवरील ताबा गेला आणि दुचाकीची धडक सरळ लोखंडी संरक्षक कठड्याला बसली. डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला. पिळये धारबांदोडा येथील सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाठिमागे बसलेली पत्नी हेल्मेट परिधान केल्याने सुखरूप बचावली. काही वेळासाठी काढलेल्या हेल्मेटमुळे पतीला जीव गमावण्याची वेळ आली.
मयत कांदोळीतला मासे विक्रेता
शेकप्पा उर्फ अशोक हा कांदोळी बार्देश येथे घरोघरी जाऊन मासळी विक्रीचा व्यवसाय करीत होता. या व्यवसायावर त्याने बऱ्यापैकी जम बसवला होता. रविवारी सुट्टी घेऊन मूळ गावी जाऊन येण्यासाठी तो निघाला असता क्रूर काळाने झडप घातली. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. सुखी संसारात क्षणात होत्याचे नाही झाल्याने पत्नी हुंदके देत हंबरडा फोडत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नोतवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून याप्रकरणी महिला उपनिरीक्षक विभावरी गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुळे पोलिस अधिक तपास करीत आहेत.