Red Alert Ghat, konkan : राज्यात उद्या अतिमुसळधार पाऊस, कोकणासह, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट
सातारा, पुणे, कोल्हापूर, मुबंई आणि कोकणातील जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षबागा, भातपिके, ऊस, मका, हळदसारख्या पिकांत पाणी साचून राहिले आहे. शेतीची काम अर्धवट राहिल्याने आणि पावसाळी भातपिकासाठी रान तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील चार दिवसांपासून सातारा, पुणे, कोल्हापूर, मुबंई आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असल्याने घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आणि कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
उद्या (ता.27) पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत वाऱ्याच्या वेगासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 28 व 29 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. दरम्यान, या काळात घाट विभागांत येलो अलर्ट जारी केला आहे.
विजांच्या कडकडासह पाऊस पडणार असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टी परिसरात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाच्या वातावरणात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठ दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडत आहेत.
मागील एक आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील सहा ते सात बंधारे पाण्याखाली गेले असून काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली आले आहेत. राजाराम बंधारा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच साताऱ्यात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. नाशिक, पुण्यासह काही जिह्यांत 27 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
जिह्यात व घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा प्रतितास 40-50 कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट यंदा वेळेआधीच पावसाचे आगमन झाल्याने अहिल्यानगर जिह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच जिह्यातील वीटभट्टी चालकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय.