टोमॅटो दर गडगडला : पावसामुळे रताळी आवक रखडली
कांदा-बटाटा-गूळ भाव स्थिर : भाजीपाला दरही स्थिर : पालेभाज्यांच्या आवकेत घट
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा, इंदोर बटाटा, आग्रा बटाटा आणि गुळाचा भाव प्रति क्विंटल स्थिर आहे. सध्या सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रताळी उत्पादन जमिनीमध्येच अडकून राहिले आहे. त्याचप्रमाणे भाजीमार्केटमध्ये सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक येत आहे. पावसामुळे लाल भाजी व काही मोजका भाजीपाला आवकेत थोड्या प्रमाणात घट निर्माण झाली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. टोमॅटो ट्रेच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून प्रति ट्रेचा भाव 200 पासून 400 रुपयांपर्यंत झाला आहे. तसेच कोथिंबीर देखील शेकडा भाव 500 रुपयांहून 900 रुपयापर्यंत झाला आहे.
गेल्या एक महिन्यापासून कांदा, बटाटा, गूळ आणि भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. महाराष्ट्रमधून जुना कांदा आणि कर्नाटकातून देखील जुना कांदा आवक येत आहे. तर भाजीमार्केटमध्ये पावसामुळे भाजीपाल्याना मागणी थोड्या प्रमाणात मंदावली आहे. तरीदेखील दरात मात्र स्थिरता आहे. मार्केट यार्डमध्ये शनिवार आणि बुधवार असे दोन दिवस कांदा, बटाट्याचा सवाल होतो. आवठवड्यातून दोन दिवस कांद्याचा बाजार भरतो. तर भाजीमार्केटमध्ये दररोज पहाटे 5 वाजल्यापासून दुपारपर्यंत भाजीपाल्याचे व्यवहार सुरू असतात. दुपारनंतर गोवा, कोकणपट्टा, कारवार व इतर ठिकाणी भाजीपाल्यांच्या ट्रका रवाना होतात. मागील शनिवार दि. 27 रोजी झालेले दर, कांदा भाव 2000-3400 रु., इंदोर बटाटा भाव 2700-3300 रु., आग्रा बटाटा भाव 2600-2950 रु., कर्नाटक कांदा भाव 2000-3200 रु., गुळाचा भाव 5000-5500 पर्यंत झाला होता. पांढऱ्या कांद्याचा भाव 1800 पासून 3400 रुपये झाला होता.
बुधवार दि. 31 रोजी झालेला भाव, महाराष्ट्र कांदा 2000-3200 रु., कर्नाटक कांदा 1500-3100 रु., आग्रा बटाटा 2600-2900 रु., इंदोर बटाटा 3000-3200 रु., पांढरा कांदा 1900-3500 रु., गूळ 5000-5500 रु. भाव झाला होता. तेच भाव शनिवार दि. 3 रोजी झालेल्या मार्केट यार्डच्या बाजारात झाले. यामुळे बाजार दरात स्थिरता टिकून आहे.
टोमॅटो भाव गडगडला
टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही वेळा 1500-2500 रु. ट्रे टोमॅटोचा भाव असतो. तर काही वेळा 100-300 रु. ट्रे टोमॅटो भाव असतो. यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकत आहे. स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन घेत आहेत. तसेच परराज्यातून देखील टोमॅटो आवक येते. आवक वाढताच दर घसरतो. राज्यामध्ये टोमॅटो आवक वाढल्याने सर्वत्र टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होऊ लागल्याने शेतकरी टोमॅटो काढून त्वरित विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.
रताळी उत्पादन जमिनीमध्ये अडकले
तालुक्याच्या पश्चिम भारातील गावांमध्ये रताळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे सध्या मार्केट यार्डमध्ये 12 महिने देखील रताळी मिळतात. बेळगावच्या रताळ्याना दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रमध्ये मागणी असते. खाण्यासाठी बेळगावची रताळी चवदार आणि स्वादिष्ट असतात. यामुळे परराज्यातून मागणी असते. सध्या तालुक्यामध्ये रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. याचे उत्पादन दोन महिन्यानंतर येणार आहे. तर यापूर्वी लागवड केलेली रताळी काढणीला आले आहेत. ती रताळी पावसामुळे काढता येत नसल्या कारणामुळे जमिनीमध्येच आहेत. यामुळे मार्केट यार्डमध्ये गेल्या एक महिन्यापासून रताळ्याची एक पिशवी आवक देखील आली नाही. पाऊस ओसरल्यावरच ती रताळी काढून भरता येते, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
भाजीपाला भाव स्थिर
गेल्या एक महिन्यापासून भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. कारण पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोवा आणि कोकणपट्ट्यासह कारवारमधून हिरव्या पालेभाज्यांना मागणी कमी आहे. या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. तर बेळगाव परिसरातील भाजीपाला उत्पादन वाढले आहे. पावसातच शेतकरी शेतामधील भाजीपाला काढून विक्रीसाठी पाठवत आहेत. नाहीतर पावसामुळे भाजीपाला खराब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.