टॉम लॅथम, सँटनरची अर्धशतके, न्यूझीलंड 9/315
केन विल्यम्सनची स्वस्तात विकेट, टीम साऊदीची फटकेबाजी : गस अॅटकिन्सन, मॅथ्यू पॉटसचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
इंग्लंडविरुद्ध हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली आहे. शनिवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 9 गडी गमावून 315 धावा केल्या होत्या. मिचेल सँटनर 50 धावांवर नाबाद परतला. हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा कर्णधार टॉम लॅथमने 63, विल यंगने 42, केन विल्यमसनने 44 आणि टॉम ब्लंडेलने 21 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी इंग्लंडला बराच वेळ वाट पाहावी लागली. न्यूझीलंडची पहिली विकेट 105 धावांवर पडली. कर्णधार टॉम लॅथम व विल यंग यांनी शतकी भागीदारी साकारली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या यंगला अॅटकिन्सनने बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार लॅथमने अर्धशतकी खेळी साकारताना 9 चौकारासह 63 धावांचे योगदान दिले. अर्धशतकानंतर तो मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. रचिन रविंद्र (18), डॅरिल मिचेल (14) हे दोघेही फार काळ मैदानावर टिकले नाहीत.
केन विल्यम्सनने स्वत:ला केले आऊट
दिग्गज खेळाडू केन विल्यम्सनने मात्र 9 चौकारासह 44 धावांची खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. त्याला मॅथ्यू पॉट्सने बोल्ड केले मात्र, विल्यम्सन ज्या विचित्र पद्धतीने बोल्ड झाला, ते पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचा अशाप्रकारे बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, विल्यमसनने 59 व्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला. परंतु चेंडू चुकला आणि स्टंपजवळ गेला. यानंतर विल्यमसन पटकन वळला आणि त्याने पायाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र असे करताना चुकीने त्याचा पाय स्टंपवर आदळला. अशाप्रकारे विल्यमसनने स्वत:च स्वत:ला बाद केले.
सॅटनरचे अर्धशतक, इतर किवीज फलंदाज अपयशी
विल्यम्सन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला टॉम ब्लंडेल व ग्लेन फिलीप्स हे दोघेही सपशेल अपयशी ठरले. मिचेल सँटनरने मात्र संयमी अर्धशतकी खेळी साकारताना 54 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह नाबाद 50 धावा केल्या. सँटनरच्या खेळीमुळे किवी संघाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला टीम साऊदीने 10 चेंडूत 23 धावा करत चांगली साथ दिली. अखेरच्या सत्रात साऊदी व मॅट हेन्री बाद झाले. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सँटनर 50 तर ओरुके 0 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 82 षटकांत 9 बाद 315 (टॉम लॅथम 63, विल्यम्सन 44, यंग 42, सॅटनर खेळत आहे 50, पॉट्स व अॅटकिन्सन प्रत्येकी तीन बळी).
अखेरच्या कसोटीत साऊदीने ख्रिस गेलला टाकले मागे
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये टीम साऊदी आपल्या कारकिर्दीचा शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. साऊदी जेव्हा कसोटी क्रिकेटच्या मैदानावर उतरत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. निवृत्तीच्या निमित्ताने त्याचे कुटुंबीयही मैदानावर उपस्थित होते. आपल्या लाडक्या मुलीला कडेवर घेऊन तो मैदानात उतरला. या वेळी सर्व सहकारी त्याच्या मागे राहिले. यादरम्यान, त्याने 10 चेंडूत 23 धावांची खेळी साकारली. शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात 3 षटकार मारल्यानंतर साऊदीने अनेक दिग्गजांना मागे टाकले. कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी आला आहे. त्याच्या नावे कसोटीत 98 षटकार आहेत. साऊदीच्या नावावर आता कसोटीत 98 षटकार आहेत आणि या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्यानंतर ख्रिस गेल आणि जॅक कॅलिसचे नाव आहे. या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स 133 षटकारासह अव्वलस्थानी आहे.
कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
- बेन स्टोक्स - 133 षटकार
- ब्रेंडॉन मेकॉलम- 107 षटकार
- अॅडम गिलख्रिस्ट - 100 षटकार
- टीम साऊदी - 98 षटकार
- ख्रिस गेल - 98 षटकार.