टॉम होमन यांना अमेरिकेत मोठी जबाबदारी
डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय : अवैध स्थलांतरितांना रोखण्याचे कार्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या टीममध्ये अनेक जणांची नियुक्ती करत आहेत. यात आता टॉम होमन यांचे नाव जोडले गेले असून ते ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात इमिग्रेशन अँड कस्टम इन्फोर्समेंट विभागात कार्यकारी संचालक राहिले होते. अमेरिकेच्या सीमांवरील घुसखोरी रोखण्याचे कार्य होमन यांच्यापेक्षा कुणीच चांगल्याप्रकारे करू शकत नसल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
अमेरिकेच्या सीमांची जबाबदारी टॉम होमन सांभाळतील. यात दक्षिण सीमा, उत्तर सीमा, सर्व सागरी अणि हवाई सुरक्षा सामील असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. होमन हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात झिरो टॉलरन्स इमिग्रेशन पॉलिसीचे प्रमुख पुरस्कर्ते होते. या धोरणानुसार हजारो अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मुलांपासून वेगळे करण्यात आले होते.
अवैध स्थलांतरितांना रोखण्यासाठी काय करणार हे ट्रम्प तसेच त्यांच्या टीमने अद्याप जाहीर केलेले नाही. परंतु कुठल्याही प्रकारच्या उपाययोजनांसाठी आगामी ट्रम्प प्रशासनाला काँग्रेसकडून पुरेसा निधी आणि अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी अन्य देशांच्या सहकार्याची आवश्यकता भासणार आहे.
ट्रम्प हे वर्तमान अध्यक्ष जो बिडेन यांच्या इमिग्रेशन धोरणांना रद्द करण्यासाठी वेगाने पावले टाकतील, कार्यकारी अधिकारांचा वापर करत स्थलांतरितांना आश्रयासाठी अर्ज करण्याचे मार्ग कमी करतील असे मानले जात आहे.