टोकियोमध्ये टॉयलेट म्युझियम
दरवर्षीप्रमाणे यंदाही 19 नोव्हेंबर रोजी जागतिक टॉयलेट डे साजरा करण्यात आला आहे. आजही जगभरात 3 अब्जापेक्षा अधिक लोकांकडे सुरक्षित आणि साफ टॉयलेटची सुविधा नसल्याने हा दिन पाळला जातो. खुल्या जागेत शौच, अस्वच्छ पाणी आणि खराब सीव्हेज सिस्टीम दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेत असते. या पीडित लोकांमध्ये प्रामुख्याने मुलांचा समावेश असतो. यंदाच्या जागतिक टॉयलेट डेची थीम सॅनिटेशन, सेफ्टी अँड डिग्निटी फॉर ऑल होती. याचा अर्थ सर्वांसाठी स्वच्छता, सुरक्षा आणि सन्मान आहे. तर टॉयलेट केवळ एक सुविधा नसून मुलांची सुरक्षा, महिलांचे समर्थन, आजार कमी करणे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित जीवन सुनिश्चित करणे आवश्यक असल्याच्या गोष्टीवर ही थीम आधारित होती.
जगात एक असा देश आहे, जेथे टॉयलेट म्युझियम तयार करण्यात आले आहे. जपानमध्ये हे अनोखे म्युझियम आहे. टोकियोमध्ये एका म्युझियमला पूप थीमवर डिझाइन करण्यात आले आहे. या म्युझियममध्ये कँडी, मार्शमॅलो, कप केक आणि आइस्क्रीम प्रत्येक गोष्टीचे डिझाइन पूपसारखे तयार आहे. तर या टॉयलेट म्युझियमच्या एंट्री गेटलाही एका टॉयलेट सीटप्रमाणे आकार देण्यात आला आहे. या टॉयलेट म्युझियमच्या आत जाताच फूड शॉपयुक्त सजावट, लाइट शो आणि मजेशीर गेम्स आणि टॉयलेट पेपर थीमवर निर्मित सेटअप दिसून येतो. टोकियोचे हे म्युझियम जपानच्या संस्कृतीलाही दर्शविते, ज्यात साफ-सफाई आणि हायजीनला अत्यंत महत्त्व दिले जाते. टोकियोतील या म्युझियममध्ये जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते. याचे प्रवेशशुल्क टोकियोच्या इतर म्युझियमनुसारच निश्चित होते. जपानमध्ये निर्मित या म्युझियमला पाहण्यासाठी विदेशी पर्यटकही गर्दी करत असतात.