राज्यभरात आज यलो अलर्ट आणखी चार दिवस राहणार
पाऊस : हवामान खात्याची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेला पाऊस आणखी चार दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी बेंगळूरसह राज्यातील अनेक भागात उत्तम पाऊस झाला आहे. रात्री बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. बेंगळूरमध्ये मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी रस्ते कालव्यासारखे दिसत होते. तसेच वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. किनारपट्टी आणि मलनाडमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे, असे कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने हवामान खात्याच्या अंदाजावर म्हटले आहे. राज्याच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.