हालसिद्धनाथ यात्रेचा आज मुख्य दिवस
मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा
वार्ताहर/कोगनोळी
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दि. 8 रोजी सकाळी श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) व रात्री ढोल जागर, दि. 9 रोजी रात्री ढोल जागर व श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा), दि. 10 रोजी रात्री श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) व उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक आदी कार्यक्रम पार पडले. दि. 11 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी दिवसभर श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. रात्री श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) झाल्यानंतर उत्तर रात्री दुसरी मुख्य भाकणूक असे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दि. 12 रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) होऊन यात्रेची सांगता होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त आप्पाचीवाडी- कुर्ली हालसिद्धनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाने मंदिर परिसरासह अन्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली आहे. भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध केले आहे. यात्रा परिसरात व्यापाऱ्यांनी खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, नारळ, कापूर, साखर आदींची दुकाने थाटली आहेत. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार व निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.