आज उमेदवारी अर्जासाठी शेवटचा दिवस
दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक : राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी
बेंगळूर : राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, कलबुर्गी, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे आणि शिमोगा मतदारसंघात 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी विविध नेत्यांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. शिमोगा मतदारसंघातून रिंगणात उतरलेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप कार्यकर्त्यांसह मिरवणुकीद्वारे येऊन उमेदवारी सादर करणाऱ्या बी. वाय. राघवेंद्र यांना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, एच. डी. कुमारस्वामी यांनी पाठिंबा दिला. यानंतर शिमोगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोन्ही नेते सहभागी झाले होते. प्रतिष्ठेच्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून प्रियांका जारकीहोळी यांनीही आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
गद्दीगौडर-उमेश जाधव यांचा अर्ज दाखल
बागलकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, विद्यमान खासदार पी. सी. ग•ाrगौडर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसह मिरवणुकीद्वारे येऊन ग•ाrगौडर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. कलबुर्गी मतदारसंघाचे उमेदवार, विद्यमान खासदार उमेश जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुखर्गे यांचे जावई राधाकृष्ण हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
कुमार नायक-बी.व्ही. नायक यांची उमेदवारी सादर
रायचूर एसटी राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार, निवृत्त आयएएस अधिकारी कुमार नायक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले बी. व्ही. नायक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. धारवाड लोकसभा मतदारसंघातून दिंगालेश्वर स्वामीजींनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जारी झाली असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारसंघातील अनेकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असून 20 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 22 एप्रिल शेवटचा दिवस आहे.