जुने गोवेत आज सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त
तिसवाडी : संत फ्रान्सिस झेवियर यांचे वार्षिक फेस्त बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी साजरे होणार आहे. दरवषीप्रमाणे यंदाही देश-विदेशातील लाखो भाविक बाँ जिझस बासिलिका चर्चमध्ये हजेरी लावणार आहेत.बासिलिका ऑफ बाँ जिझस येथे पहाटे 3.45 वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील. सायंकाळी 6.15 पर्यंत विविध भाषांमध्ये प्रार्थना चालू राहतील. मुख्य प्रार्थना सकाळी 10:30 वाजता होईल. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. परिसरात सीसीटीव्ही पॅमेरे, ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनीही विशेष वाहतूक नियोजन केले आहे. रस्त्यांवर एकेरी वाहतूक, विशेष पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी मार्गाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, गोव्यातील आणि जगभरातील भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हजारो भाविक श्र्रद्धेने आणि भक्तीने फेस्ताला येतात आणि प्रार्थनासभांना हजर राहतात त्यामुळे एकता आणि सलोख्याची भावना निर्माण होते. हा पवित्र प्रसंग प्रत्येक घरात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.