आज महाशिवरात्रौत्सव पर्व
भाविकांना शिवपिंडीकेवर रुद्राभिषेकाची पर्वणी
पणजी : राज्यात महाशिवरात्री पर्वास काल गुरुवारी पहाटेपासून प्रारंभ झाला असून राज्यातील श्रीशंकराच्या मंदिरांमध्ये आज शुक्रवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीचा प्रमुख आणि सर्वात मोठा उत्सव हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिरात होणार आहे. त्याशिवाय तांबडी सुर्ल येथील महादेव मंदिर, नागेशी फोंडा येथील श्रीरामनाथ, शिरोडा श्रीकामाक्षी संस्थानातील श्रीरायेश्वर मंदिर, नार्वेतील श्रीसप्तकोटेश्वर, जुने गोवेतील श्रीगोमंतेश्वर ब्रह्मपुरी, शंकरवाडी ताळगाव येथील श्रीशंकर मंदिर, रिवण सांगे येथील श्रीविमलेश्वर देवस्थान, काणकोण येथील श्रीमल्लिकार्जुन, पार खांडेपार येथील महादेव मंदिर आदी मंदिरांमध्ये जत्रोत्सवाच्या धर्तीवर धार्मिक तसेच भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या प्रमुख मंदिरांव्यतिरिक्त पेडणेपासून काणकोणपर्यंत असलेल्या शिवशंकराच्या शेकडो मंदिरांमध्येही दिवसभर अभिषेक, अन्य धार्मिक विधी, दुपारी आरती व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महाशिवरात्रीचे वैशिष्ट्या म्हणजे या दिवशी सामान्यातील सामान्य भाविक, भक्ताला स्वहस्ते शिवपिंडीकेवर ऊद्राभिषेक करण्याची मुभा असते. त्यामुळे पहाटेपासूनच भक्तमंडळींची मंदिरांच्या प्राकारात गर्दी वाढत जाणार आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता अनेक मंदिर व्यवस्थापनांनी भाविकांना महाशिवरात्रीच्या पर्वणीचा सुरळीतपणे लाभ घेता यावा या उद्देशाने योग्य व्यवस्था केली आहे.