For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज सीमावासियांचा ‘काळादिन’

12:53 PM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
आज सीमावासियांचा ‘काळादिन’
Advertisement

केंद्र सरकारविरोधात मराठी भाषिकांचा एल्गार : सायकल फेरीतून एकी दाखविणार : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. 1956 पासून आजतागायत मराठी भाषिकांचा आपल्या मातृभाषेच्या राज्यात जाण्याचा लढा सुरू आहे. 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून सायकल फेरीने केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे. सकाळी 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानापासून सायकल फेरी काढली जाणार असून त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभेचे आयोजन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरासह तालुका, खानापूर, निपाणी येथे कडकडीत हरताळ पाळला जातो. केंद्र सरकारने सीमाभागावर केलेल्या अन्यायाविरोधात काळादिन पाळून निषेध फेरी काढली जाते. काळी वस्त्रs, दंडाला काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध केला जातो. या फेरीमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होत असतात. यावर्षीही मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

Advertisement

1 नोव्हेंबर 1956 पासून पुकारला लढा

1956 मध्ये भाषावार प्रांतरचना केली गेली. परंतु, त्यावेळी बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी भाषिक बहुलभाग तत्कालिन म्हैसूर प्रांताला म्हणजेच आजच्या कर्नाटकाला जोडण्यात आला. आपल्या मातृभाषेचे राज्य मिळाले नसल्याने 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठी भाषिकांनी हा लढा पुकारला. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत महाराष्ट्रातील मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुकारला आणि तो यशस्वीही केला. त्यानंतरचा दुसरा लढा हा सीमाप्रश्नाचा आहे. आजवर सीमाप्रश्नासाठी अनेक सत्याग्रह झाले. आंदोलने झाली. या आंदोलनांमध्ये अनेक हुतात्म्यांनी आपला जीव गमावला. हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबरला सायकल फेरी काढून मराठी भाषिक आपले अस्तित्व दाखवून देत असतात.

सायकल फेरीचा मार्ग

सायकल फेरीला संभाजी उद्यान येथून प्रारंभ होणार असून चोण्णद स्टील, महाद्वार रोड, गजाननराव भातकांडे शाळा, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, अंबा भुवन रोड, शिवाजी रोड, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, शनि मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, होसूर बसवाण गल्ली, सरकारी मराठी शाळा क्र. 8, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल येथून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होईल.

परवानगी मिळाली नाहीतरी सायकल फेरी काढणारच

महाराष्ट्र एकीकरण समितीने महिनाभरापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे काळ्यादिनाच्या सायकल फेरीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे परवानगी मिळो अथवा न मिळो, काळ्यादिनाची सायकल फेरी यशस्वी करणारच, असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. सकाळी 9.30 वाजता प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सायकल फेरीला सुरुवात होणार आहे.

व्यवहार बंद ठेवून फेरीत सहभागी व्हा

सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात 69 वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळत सायकल फेरीमध्ये सहभागी व्हावे. तसेच काळी वस्त्रs, काळ्या साड्या, काळ्या टोप्या, दंडाला काळी फीत बांधून केंद्र सरकारचा निषेध करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

Advertisement
Tags :

.