Sangli Politics : ईश्वरपूर नगरपालिकेत आज मुख्यमंत्री फडणवीस - जयंत पाटील यांच्या सभांनी वाढणार राजकीय तापमान!
महायुती विरुद्ध राष्ट्रवादी श. प.: ईश्वरपूर निवडणुकीत चुरशीला उधाण
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा ज्वर वाढला असून आज रविवारी दोन्ही गटांकडून तोफा धडाडणार आहेत. महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यांची जाहीर सभा गांधी चौकात तर राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाची जाहीर सभा आ. जयंत पाटील हे यल्लामा चौकात घेणार आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप व कलगीतुरा रंगणार आहे.
यावेळी नगरपालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महायुती विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्ष असा सरळ सामना होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही गटाकडून मतदारांच्या भेटीगाठी, कोपरा सभा यामधून प्रचाराचे रान उठवले आहे. राष्ट्रवादी श.पचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे हे दोघे ही तुल्यबळ आहेत. महायुतीकडून आ. सदाभाऊ खोत, सम्राट महाडीक, निशिकांत भोसले-पाटील, राहुल महाडीक, आनंदराव पवार, अॅङ राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी विजयासाठी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाच्यावतीने आ. पाटील हे एकहाती किल्ला लढवत आहेत. यावेळच्या पालिका निवडणुकीत त्यांनी राज्य पातळीवरील कुठल्याच नेत्याला आणलेले नाही. त्यांनी स्वतः पूर्णवळ ईश्वरपूर, आष्टा नगरपालिका निवडणुकांसाठी दिला आहे. त्यांनी तळ मारून यंत्रणा हलवली आहे.आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या प्रचारासाठी येत आहेत. त्यांची सभा सायंकाळी पाच वाजता गांधी चौकात घेण्यात आली आहे. तर याच वेळेत आ. जयंत पाटील यांनी यल्लामा चौकात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे रविवारी शहरात तोफा धडाडणार आहेत.