गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
संपूर्ण बदलाची आवश्यकता असलेला गुजरात जायंट्स आज रविवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी भिडणार असून आरसीबीची मधली फळी नुकतीच फॉर्मात आलेली असल्याने त्यापासून त्यांना सावध राहावे लागेल. गुजरात आता नऊ सामन्यांतून आठ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे आणि आठ गुण झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सना मागे टाकण्याच्या दृष्टीने त्यांना विजय आवश्यक आहे.
गुजरातच्या वेगवान गोलंदाजांची प्रभावी कामगिरी करण्याची गरज आहे. या संपूर्ण आयपीएलमध्ये त्यांची वेगवान गोलंदाजी हवी तितकी धारदार राहिलेली नाही. मोहित शर्मा (10 बळी), उमेश यादव (7 बळी), संदीप वॉरियर (5 बळी) यांनी भरपूर धावा दिल्या आहेत, तर स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई यांनी देखील फारसा आत्मविश्वास वाढवलेला नाही. त्यांचे फिरकी गोलंदाज रशिद खान (8 बळी), आर. साई किशोर आणि नूर अहमद (प्रत्येकी 6 बळी) यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली नसली, तरी त्यांची कामगिरी स्थिर राहिलेली आहे.
रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीला सूर सापडल्याने आरसीबीला आशेचा नवा किरण सापडला असून हे लक्षात घेता गुजरातच्या फिरकी त्रिकुटासमोरील आव्हान आणखी कठीण होईल. मात्र येथे दवाचा फारसा त्रास होणार नसून ही बाब त्यांना दिलासादायक ठरेल. पाटीदारने केकेआरविरुद्ध 23 चेंडूंत काढलेल्या 52 धावांनी आरसीबीला विजयाच्या जवळ आणले होते, तर हैदराबादविरुद्ध त्याच्या 20 चेंडूंतील 50 धावांनी विजय मिळवून दिला. तो गुजरातच्या फिरकीपटूंविऊद्ध असाच प्रभाव पाडण्यास उत्सुक असेल.
सनरायझर्सविऊद्ध 20 चेंडूंमध्ये 37 धावा करताना ग्रीननेही प्रभावी कामगिरी केली. यामुळे आरसीबीचे दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरर यांच्यावरील अवलंबन कमी होण्यास मदत झाली अहे. तसेच सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांना जवळपास प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करण्याच्या दबावातून मुक्त केले आहे.
दुसरीकडे, गुजरातच्या साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी या आयपीएलमध्ये 300 च्या वर धावा केल्या आहेत, परंतु त्यांची मधली फळी दमदार कामगिरी करू शकलेली नाही. डेव्हिड मिलर (138 धावा), शाहऊख खान (30), विजय शंकर (73) आणि राहुल तेवतिया (153) या खेळाडूंना सातत्य दाखविता आलेले नाही. आरसीबीच्या गोलंदाजांविऊद्ध त्यांच्याकडून मोठया योगदानाची अपेक्षा संघाला असेल. आरसीबीचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (4-0-20-0) आणि यश दयाल (3-0-18-1) यांनी सनरायझर्सविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. त्यांचा लेगस्पिनर कर्ण शर्मा आणि मध्यमगती गोलंदाज ग्रीन यांनीही प्रमुख गोलंदाजांना साथ देताना प्रत्येकी 4 बळी घेतले आहेत. मात्र आरसीबीची गोलंदाजी हा कमकुवत दुवा राहिलेला आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.