..प्रसंगी बळाचा वापर करत तैवानवर ताबा मिळवू!
अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची नव्या वर्षात धमकी
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नव्या वर्षात तैवान निश्चितपणे चीनमध्ये पुन्हा सामील होणार असल्याचे म्हटले आहे. तैवान निवडणुकीपूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 13 जानेवारी रोजी तैवानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तैवान हा चीनचा हिस्सा आहे. गरज भासल्यास बळाचा वापर करत तैवानला चीनमध्ये सामील करण्यात येईल असे जिनपिंग यांनी नमूद केले आहे.
तैवान हा चीनचाच हिस्सा असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूवीं चीनने तैवानवरील सैन्य दबाव वाढविला आहे. 23 दशलक्ष लोकसंख्या असलेले कथित स्वयंशासित बेट चीनपेक्षा वेगळे नाही. तैवानवर अखेरीस बीजिंगचेच नियंत्रण असेल असे जिनपिंग यांचे सांगणे आहे. शांततापूर्ण एकीकरणात हस्तक्षेप करणाऱ्या बाहेरील शक्तींच्या विरोधात सर्व आवश्यक उपाय करण्याचा पर्याय आम्ही सुरक्षित ठेवला असल्याचे चीनने म्हटले आहे.
चीनसोबतचे संबंध हे तैवानच्या लोकांच्या इच्छेनुसार निश्चित केले जावेत. बीजिंग आमच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांनी केला आहे.