सत्तांतरासाठी अमेरिका सज्ज
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर आता त्या देशात सत्तांतराची लगबग होत आहे. मतगणनेपासून 75 दिवसांनंतर, अर्थात येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची रितसर शपथ घेतील आणि त्यांच्या द्वितीय कार्यकाळाला प्रारंभ होईल. ते आपल्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करतात, याकडे आता भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या नेत्याचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, विविध प्रशासकीय पदांवर भारतीय वंशाच्या तज्ञ नागरिकांची नियुक्ती केली जाऊ शकते. ट्रम्प यांच्या या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेचे संबंध संरक्षण आणि तंत्रज्ञान आदान-प्रदान या क्षेत्रांमध्ये अधिक दृढ होऊ शकतात, असे तज्ञांचे मत आहे. आयात-निर्यात कर, व्यापारी तुटीचा समतोल आदी मुद्द्यांवर दोन्ही देशांचे मतभेदही होण्याची शक्यता आहे. तरीही चीन आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात ट्रम्प यांची भूमिका भारतासाठी अधिक अनुकूल असल्याची शक्यता असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्वरित पदभार स्वीकारला जात नाही.
ट्रम्प विजयाचे जगभर पडसाद...
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जगभरात होत आहे साधक-बाधक चर्चा
- डोनाल्ड ट्रम्प यांना प्रथेप्रमाणे 20 जानेवारीला दिली जाणार पदाची शपथ
- जागतिक पातळीवरील परिणामांबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लेखाजोखा