जगाला वाचविण्यासाठी...
मद्याची किंवा ड्रग्जची धुंदी ही अत्यंत घातक असते, अशी शिकवण आहे. मद्य, म्हणजेच दारुच्या नशेत माणसे काहीही करु शकतात. वेळप्रसंगी ती स्वत:चा किंवा इतरांचा जीवही घेऊ शकतात. त्यांची अवस्था पिसाळल्यासारखी होते. या नशेत माणूस आपला चांगुलपणा गमावून बसतो. चांगला-वाईट विचार करण्याची सद्सद्विवेकबुद्धी गमावतो. निर्णयशक्ती नाहीशी होते. एकंदर, त्याचा अध:पात होतो. तथापि, अमेरिकेत एक घटना अशी घडली आहे, ती समजून घेतल्यानंतर आपल्या मनात दारुच्या नशेसंबंधी काही सहानुभूती निर्माण झाली तरी आश्चर्य वाटू नये. ही घटना एका मद्यव्यवसनी महिलेसंबंधात घडली आहे.
केली मुथार्ट असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने 2018 मध्ये तिने अंमली पदार्थांच्या धुंदीत एका चर्चबाहेर स्वत:चेच डोळे उपसून बाहेर काढले. या महिलेला ‘मेथ’ नामक अंमली पदार्थाचे सेवन करण्याची चटक लागली होती. ती कित्येकदा या पदार्थाच्या आहारी जाऊन धुंद अवस्थेत तासनतास घालवत असे. तिच्या शालेय जीवनात ती अतिबुद्धीवान विद्यार्थ्यांमध्ये गणली जात असे. पण ती मोठी झाल्यानंतर कुसंगतीने तिला हे व्यसन जडले, आणि तिने डोळ गमावले.
तथापि, तिने नंतर स्वत:चे डोळे बाहेर काढण्याचे जे कारण स्पष्ठ केले, ते ऐकून अनेक जणांना फारच हळहळ वाटली. प्रथम लोक तिच्यावर या तिच्या कृतीसाठी रागावले होते. पण, तिने मांडलेल्या कारणांमुळे रागाची जागा अनुकंपेने घेतली आहे. मी माझे डोळ काढल्यास जगाचे कल्याण होईल, अशी भावना मला माझ्या धुंद अवस्थेत झाली. त्यामुळे याच हेतूने मी माझ्या हाताने स्वत:चे डोळे काढले असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांना अधिक हळहळ वाटत आहे.