एका दगडाला वाचविण्यासाठी...
एका दगडाला वाचविण्यासाठी एका देशाने आतापर्यंत 4 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती आपल्याला कोणी दिली, तर ती खरी वाटणे अशक्य आहे. तथापि, खरोखरच असा प्रकार घडला आहे. या देशाचे नाव जपान आहे. या दगडाचे नाव ‘ओकिनोटोरेशिमा’ असे आहे. हा दगड जपानच्या मुख्य भूमीपासून समुद्रात 1 हजार 740 किलोमीटर अंतरावर आहे. अर्थातच हा सुटा दगड नसून तो एका अत्यंत छोट्या खडकाच्या स्वरुपात आहे. त्यांची लांबी-रुंदी 12 फूट गुणिले 14 फूट इतकी असून तो एका बेडरुमपेक्षाही लहान आहे. त्याचे क्षेत्रफळ 16 चौरस मीटर किंवा 160 चौरस फूट आहे. आता इतक्या छोट्या खडकाला वाचविण्याचा प्रयत्न जपान का करत आहे, हे समजून घ्यावे लागते.
आंतरराष्ट्रीय नियमानुसार समुद्रात एखादे छोटे बेट असले तरी, त्याच्या अवतीभोवतीच्या 370 किलोमीटर त्रिज्येचा सागरीय प्रदेश त्या देशाच्या मालकीला होतो. या प्रदेशातील सर्व सागरी संपत्ती त्या देशाची होते. या खडकामुळे जपानला 4 लाख 32 हजार चौरस किलोमीटरचा सागरी प्रदेश जपानला अधिकारीक आर्थिक विभाग (एक्स्क्यूझिव्ह इकॉनॉमिक झोन) म्हणून मिळत आहे. हा खडक जर समुद्रात बुडाला किंवा अन्य कोणत्या देशाने त्यावर स्वामित्व मिळविले, तर जपानला हा आर्थिक प्रदेश गमवावा लागणार आहे. म्हणून कितीही पैसा खर्च झाला, तरी या खडकाचे संरक्षण करणे हे जपानला त्याच्या आर्थिक कारणांसाठी आणि संरक्षणात्मक कारणासाठी आवश्यक आहे. जपानने या खडाकाला एखाद्या संरक्षित किल्ल्यासारखे स्वरुप दिले असून त्याच्या भोवती तटबंदी उभी केली आहे. प्रतिदिन जपानी जलसेनेच्या तुकड्या या खडकाचे संरक्षण करण्यासाठी तेथे जात येत असतात. जपान देशाचे एकंदर क्षेत्रफळ जितके आहे, त्याच्या दुप्पट सागरी भागावर, या खडकामुळे जपानचा आर्थिक अधिकार प्रस्थापित झाला आहे.