विम्याची रक्कम मिळविण्यासाठी...
पैसे मिळविण्यसाठी कोण काय करेल, हे सांगता येणे कठीण आहे. गरीबी दूर करण्यासाठी काही लोक आपले एक मूत्रपिंड विकण्यासही राजी होतात, अशी वृत्ते आपण अनेकदा वाचलेली असतात. केवळ भारतातच नव्हे, तर ब्रिटनसारख्या ‘महासत्ता’ असणाऱ्या देशातही स्वत:ची हानी सहन करुन धन मिळविण्याची प्रवृत्ती असणारे लोक कमी नाहीत. सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकही अशा प्रतापांमध्ये मागे नसतात, असे अनेक घटनांवरुन आपल्याला दिसून येत असते.
ब्रिटनमध्ये सध्या असे एक प्रकरण गाजत आहे. येथील एक शस्त्रक्रिया विशारद किंवा सर्जन नील हॉपर याने विम्याची 5.5 कोटी रुपयांची भरभक्कम रक्कम पदरी पाडून घेण्यासाठी स्वत:चे दोन्ही पाय कापल्याही ही घटना आहे. या सर्जनवर तसा आरोप ठेवण्यात आला आहे. आपण आपल्या कुटुंबासमवेत 2020 मध्ये सहलीला गेलो होतो, त्यावेळी आपल्याला अपघात झाला होता. या अपघातामुळे ‘सेप्सिज’ नामक जीवघेणा विकार आपल्याला जडला. परिणामी, आपले दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे ते काढून टाकावे लागले, असे प्रतिपादन त्याने एका टीव्ही शो मध्ये केले होते. दोन पाय गमावलेल्या स्थितीतही त्याने आपल्या शस्त्रक्रिया विशारदाचा व्यवसाय पुढे चालविल्याने त्याला ‘अँप्लिफॉन’ हा पुरस्कार देऊन त्याचा सत्कार करण्यात आला होता. आपला डावपेच यशस्वी झाल्याच्या आनंदात तो असतानाच त्याचे बिंग बाहेर पडल्याने तो अडचणीत आला आहे. त्याचा विकार हा एक बनाव होता आणि त्याने आपलेच पाय काढून घेण्याचे कृत्य हे विम्याची साडेपाच कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी केले होते, हे नंतर स्पष्ट झाले. जेव्हा विमा कंपनीने त्याचा क्लेम देण्यासाठी त्याच्या विकाराच्या कागदपत्रांची छाननी केली, तेव्हा काहीतरी पाणी मुरते आहे, हे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. या तपासात त्याचा बनाव उघड झाला. आता त्याची स्थिती अत्यंत कठीण झाली आहे. दोन पाय तर गेलेलेच आहेत. खेरीज विम्याची रक्कम मिळणे दुरापास्त झाले आहे. कारण विमा कंपनीने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून त्याला न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी अशी कृत्ये करणे किती धोकादायक सिद्ध होऊ शकते, हे दिसून आले. हा इतरांसाठीही धडा आहे.