For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

10:54 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
Advertisement

काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर  यांनी मतदारसंघात आपला झंझावाती प्रचार दौरा सुरू केला असून, आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघात त्यांनी दोन वेळा मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मंगळवार दि. 16 रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात केली. त्यावेळी खानापूर तालुक्यातील काही ग्राम पंचायतींना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. या प्रचारदौऱ्यात ‘तरुण भारत’शी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, काँग्रेसने खानापूरला प्राधान्य देऊन माझी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याला देश पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे. यासाठी तालुक्यातील जनतेने पक्षीय राजकारणाचा विचार न करता विकासाच्या दृष्टिकोनातून मला नेतृत्वाची संधी द्यावी. आजपर्यंतच्या भाजपच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या,  कारवार मतदारसंघाचे भाजपने सलग 30 वर्षे नेतृत्व केले आहे. या तीस वर्षात संपूर्ण मतदारसंघात कुठेही विकास झालेला दिसत नाही. विकासासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, कारवार मतदारसंघातील जनतेवर सातत्याने अन्यायच झालेला आहे. दहा वर्षे केंद्रात सत्ता असताना भाजपच्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. मात्र, याचा मतदारसंघातील जनतेला काहीच उपयोग झाला नाही. कारवारमधील बंदरांचे खासगीकरण करण्यात आले आहे. सी-बर्डसारख्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगारापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे कारवारसह आसपासच्या विधानसभा मतदारसंघातील युवकांवर बेकारीची वेळ आली आहे. यासह अनेक गोष्टींचा येथे उहापोह करावा लागेल. मुख्य म्हणजे अतिक्रमित शेतकऱ्यांवर अतोनात अन्याय झालेला आहे. मतदारसंघातील सव्वा लाख शेतकऱ्यांनी सरकारकडे अर्ज केले आहेत. मात्र, त्याबाबत थोडीही दखल घेण्यात आलेली नाही. अतिक्रमित शेतकऱ्यांकडून 90 कोटी रुपये भरून घेतले असून त्यांना आजही न्याय देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांकडून कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावाने करण्यात आलेल्या नाहीत. मी निवडून आल्यानंतर संसदेत पहिल्यांदा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारही सकारात्मक आहे.

मतदारसंघातील औद्योगिक विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भाजपने या मतदारसंघाचे सलग तीस वर्षे नेतृत्व केले आहे. यातील दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता असताना आणि कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रात मंत्री असताना त्यांनी संपूर्ण कारवार मतदारसंघात औद्योगिक विकासासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. खानापूर, कित्तूर तालुक्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. संपूर्ण कारवार लोकसभा मतदारसंघात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. यात प्रामुख्याने पर्यटनासह इतर उद्योग आणणे गरजेचे होते. पर्यटनासाठी गोकर्ण, मुर्डेश्वर, इडगुंजी, उळवी यासह अनेक स्थळे आहेत. जंगल आणि समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनाला चांगला वाव असताना थोडाही विचार करण्यात आलेला नाही. उद्योग व्यवसायाबाबतही दुर्लक्ष झाल्याने विकास खुंटला आहे. त्यामुळे युवक आणि महिलांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे कारवार मतदारसंघातील अनेकांनी स्थलांतर केले आहे. मी निवडून आल्यास गोवा आणि केरळच्या धर्तीवर समुद्र किनाऱ्यांसह इतर ठिकाणी पर्यटन व्यवसायासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी लोकसभेत ज्वलंतपणे समस्या मांडून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारवार मतदारसंघातील सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्राधान्य देऊन त्याची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न पेले जातील. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कारवार, शिर्शी भागातीलच उमेदवार देण्यात येत होता. मात्र, काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांच्या संमतीने माझी उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे कित्तूर आणि खानापूर मतदारसंघात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी खानापूर आणि कित्तूर येथील जनतेने मिळालेल्या संधीचे सोने करण्याची वेळ आली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातून 1 लाखाच्यावर निश्चित मताधिक्य मिळणार आहे. मराठा समाजासह मतदारसंघातील सर्व जाती-धर्माचे मतदार माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे मला विजयाची निश्चित खात्री आहे. काँग्रेसचा झेंडा लोकसभेत फडकावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

काँग्रेस बोलते ते करून दाखवते

2023 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पाच गॅरंटींची घोषणा केली होती. निवडून आलेल्या काही दिवसातच योजना लागू केल्या आहेत. त्याचा फायदा सामान्य महिलांना, युवकांना झाला आहे. शून्य लाईट बिल योजनेतून कोट्यावधी कुटुंबांना वीज बिलापासून मुक्ती मिळाली आहे. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी काँग्रेसने महिलांना प्रतिमहिना दोन हजारचे मानधन मिळत आहे. तसेच सुशिक्षित युवकांसाठी मदतनिधी योजनेतून लाभ मिळत आहे. यासाठी निश्चितच मतदार काँग्रेसच्या पाठिशी राहतील आणि माझा विजय निश्चित आहे, यात शंका नाही.

Advertisement
Tags :

.