For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहाजहान शेखला अटक, पक्षातून निलंबित

01:11 PM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहाजहान शेखला अटक  पक्षातून निलंबित
Advertisement

संदेशखाली प्रकरणातील मुख्य सूत्रधार : न्यायालयाकडून 10 दिवसांची कोठडी

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचार, महिलांचे लैंगिक शोषण आणि दलित तसेच आदीवासींच्या जमिनी हडपण्याच्या प्रकरणांमधील मुख्य सूत्रधार आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच याला तृणमूल काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. मात्र, त्याला नेमकी कोठे अटक करण्यात आली, याची माहिती देण्यात आली नाही. तथापि, हे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नाटक असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. शेख याच्या अटक वॉरंटमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचारांचा उल्लेख नाही, ही बाब बोलकी आहे. शेख याला केवळ जनतेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गांभीर्याने कारवाई केली जाणार नाही, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली.

Advertisement

सीबीआय चौकशीवर सोमवारी सुनावणी

शेख हा तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याने त्याची चौकशी पश्चिम बंगाल प्रशासनाकडे असू नये. त्याच्यावरील गंभीर गुन्हे पाहता ही चौकशी सीबीआयकडून करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करणारी याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सीबीआय चौकशीचा आदेश दिला गेल्यास तृणमूलची केंडी होणे शक्य आहे.

राजधर्माचे पालन केले

शेख याला अटक करुन आम्ही राजधर्म पाळला, अशी टिप्पणी तृणमूल काँग्रेसने केली. आमच्या पक्षाच्या नेत्यालाही आम्ही सोडलेले नाही. यावरुन आमचे सरकार स्वच्छ असल्याचे सिद्ध होते. भारतीय जनता पक्ष करीत असलेले आरोप खोटे आहेत. हा पक्ष या प्रकरणाचे राजकारण करीत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला असून कारस्थान उघडे पाडू असा इशारा दिला आहे.

ईडीवर फोडले खापर

साधारणत: दोन महिन्यांपूर्वी शेख याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी गेले असताना त्यांना गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली होती. त्याचवेळी ईडीने कारवाई करणे आवश्यक होते. न्यायालयाने शेख याच्या विरोधात कारवाई करण्यास स्थगिती दिल्याने त्याला अटक करण्यासाठी 55 दिवसांचा विलंब लागला, असे पश्चिम बंगाल पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने प्रतिपादन केले आहे मात्र, ईडीने हा आरोप स्पष्टपणे फेटाळत, कोणताही कालापव्यक झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.