चिदंबरम यांच्या सुरात तिवारींचा सूर
2008 च्या मुंबई हल्ल्यासंबंधी काँग्रेसची कोंडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 2008 मध्ये मुंबईवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळच्या मनमोहनसिंग सरकारने अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानवर कारवाई करण्याचे टाळले होते, असा गौप्यस्फोट त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनीही आता चिदंबरम यांच्या सुरात सूर मिसळल्याने काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
चिदंबरम यांच्या विधानांकडे काँग्रेस दुर्लक्ष करु शकत नाही. अमेरिकेच्या दबावाखाली त्यावेळच्या भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई केली नसेल, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. चिदंबरम हे त्यावेळी भारताचे गृहमंत्री होते. त्यांनी हा कारवाईचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच, त्यावेळचे नेते मनमोहनसिंग यांचाही विचार कारवाई करावी असाच होता. तथापि, कारवाई केली गेली नाही. अमेरिकेच्या त्यावेळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कोंडोलिझा राईस यांनी भारतात येऊन भारत सरकारला अशी करवाई करु नका, असे बजावले होते. त्यामुळे दबावाखाली येऊन भारत सरकारने कारवाई टाळली, अशी माहिती चिदंबरम यांनी दिली होती. आता तिवारी यांनीही या माहितीची अप्रत्यक्ष पुष्टी केल्याने काँग्रेसची कोंडी वाढणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्बळ आहेत, असा आरोप नुकताच राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि, मनमोहनसिंग यांचेच सरकार दुर्बळ आणि अमेरिकेच्या दबावाखाली काम करणारे होते, हे चिदंबरम यांच्या गौप्यस्फोटामुळे उघड झाले आहे. परिणामी राहुल गांधी यांच्या आरोपातील हवा आता गेली असून काँग्रेसच उघडी पडली आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
200 हून अधिक जणांचा मृत्यू
26 नोव्हेंबर 2008 या दिवशी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबई शहरात घुसून दहशतवादी हल्ला केला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, तसेच ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करुन 200 हून अधिक निरपराध नागरीकांचे बळी घेतले होते. या दहशवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. त्याला फाशी देण्यात आली होती.