Kokan News: तिवरे पोस्ट कार्यालयात अपहार, शाखा डाकपालाविरोधात गुन्हा दाखल
2 लाख 23 हजार रुपयांच्या अपहाराची राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद
राजापूर : पोस्टातील बचत खात्यात जमा करण्यासाठी दिलेल्या खातेदारांचे पैसे स्वत:जवळ ठेवत तसेच खातेदारांच्या खोट्या सह्या, अंगठे लावून खात्यातील पैसे काढून एकूण सुमारे 2 लाख 23 हजार रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी तालुक्यातील तिवरे पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपाल अमोल एकनाथ गोतावडे (29, रा. गोतावडेवाडी, राजापूर) याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
या प्रकरणी राजापूर डाकघर निरीक्षक योगेश प्रकाश जाधव यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यामध्ये अमोल एकनाथ गोतावडे हा पोस्ट तिवरे येथे शाखा डाकपाल म्हणून काम करीत असताना त्याने 9 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत पदाचा गैरवापर करून 11 खातेदारांच्या पोस्ट खात्यातील रकमेचा निकाश पावतीवर खोट्या अंगठे व सह्या करुन 1 लाख 51 हजार एवढी रक्कम काढली.
तसेच सत्यवती भानू सुद व ऋतुजा गणपत तारळ या खातेदारांचे नवीन खाते न उघडता त्यांनी बचत खात्यात ठेवण्यासाठी दिलेली 40 हजार रुपये रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली व शालिनी सहदेव साळवी, सुरेखा सुरेश गुजीर व स्वप्नाली अनाजी तरळ या तीन खातेदारांच्या बचत खात्यामध्ये 32 हजार 500 रुपये रक्कम जमा न करता स्वत:कडे ठेवून घेतली.
अशा एकूण 16 खातेदारांचे 2 लाख 23 हजार 500 रुपये घेवून त्यांची फसवणूक करुन अपहार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान डाकघर निरीक्षकांनी संशयित आरोपी अमोल गोतावडे याच्याकडून व्याजासह 2 लाख 42 हजार रुपये रक्कम हस्तगत केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसानी अमोल गोतावडे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 316 (5) व 336 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.