टेलर फ्रिट्झ-सिनेरमध्ये जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था/ ट्युरिन (इटली)
2024 च्या टेनिस हंगामाअखेरच्या येथे सुरु असलेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ आणि इटलीचा जेनिक सिनेर यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टेलर फ्रिझने जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हचा 6-3, 3-6, 7-6 (7-3) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर दुसऱ्या एका सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने नॉर्वेच्या कास्पर रुडवर 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये मात करत अंतिम फेरी गाठली.
एटीपी फायनल्स स्पर्धेत 2006 नंतर अंतिम फेरी गाठणारा टेलर फ्रिट्झ हा अमेरिकेचा पहिला टेनिसपटू आहे. 2006 साली अमेरिकेच्या जेम्स ब्लेकने अंतिम फेरी गाठली होती. इलाईट 8 खेळाडूंच्या या स्पर्धेत 1999 साली अमेरिकेच्या पीट सांप्रासने जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या आंद्रे अॅगास्सीचा पराभव केला होता. 2024 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत फ्रिट्झ उपविजेतेपद मिळविले आहे. 2024 च्या एटीपी फायनल्स स्पर्धेत प्राथमिक फेरीतील सामन्यात फ्रिट्झला सिनेरकडून पराभव पत्करावा लागला होता.
गेल्या आठवड्यात झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने अजिंक्यपद पटकाविले होते. आता पुरुषांच्या एटीपी फायनल्स स्पर्धेत अमेरिकेचा टेलर फ्रिझ जेतेपद मिळविण्यासाठी आतूरलेला आहे. फ्रिझने एटीपी फायनल्स स्पर्धेत आपला दुसऱ्यांदा सहभाग दर्शविला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने या स्पर्धेत पदार्पण करताना सलामीच्या सामन्यात स्पेनच्या नदालचा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली होती.
फ्रिट्झ आणि व्हेरेव्ह यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामना चुरशीचा झाला. फ्रिट्झने पहिला सेट 6-3 असा जिंकल्यानंतर व्हेरेव्हने आपल्या खेळामध्ये खूपच बदल करताना बेसलाईन खेळावर अधिक भर दिला. व्हेरेव्हने दुसरा सेट 6-3 असा जिंकून फ्रिट्झशी बरोबरी साधली. तिसरा आणि शेवटचा सेट अपेक्षेप्रमाणे टायब्रेकरपर्यंत लांबला. अखेर फ्रिट्झने हा सेट जिंकून व्हेरेव्हचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. 2 तास 20 मिनिटे चाललेल्या या सामन्यात फ्रिट्झने 15 तर व्हेरेव्हने 10 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.