भारतीय फुटबॉल संघाची आज मलेशियाशी मैत्रिपूर्ण लढत
वर्षभरातील विजयाचा दुष्काळ दूर करण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ हैदराबाद
मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील तसेच वर्षातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या भारताला आज सोमवारी येथे आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण फुटबॉल सामन्यात परिचित प्रतिस्पर्धी मलेशियाचा सामना करावा लागणार आहे. वरिष्ठ खेळाडू आणि मध्यरक्षक संदेश झिंगनने जानेवारीमध्ये एएफसी आशियाई चषक स्पर्धेत राष्ट्रीय संघाकडून खेळल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी पुनरागमन केल्यामुळे भारताला बळ मिळेल. लिगामेंटच्या दुखापतीतून आता तो ठीक झाला आहे.
भारतीय संघ वर्षभरात आतापर्यंत 10 सामने खेळला आहे, त्यापैकी सहा गमावले आहेत आणि चार अनिर्णित राहिले आहेत. आतापर्यंत मानोलो यांच्या नेतृत्वाखाली ते तीन सामने खेळले आहेत. त्यांची जुलैमध्ये इगोर स्टिमॅच यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दोन वेळा सामने बरोबरीत राहिले आहेत, तर एकदा पराभव पत्करावा लागला आहे.
सोमवारच्या सामन्याचे ठिकाण असलेल्या गचिबोवली स्टेडियमवरच सप्टेंबरमध्ये झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत भारताने मॉरिशसविऊद्ध बरोबरी साधली होती आणि सीरियाकडून 0-3 ने ते पराभूत झाले होते. 12 ऑक्टोबर रोजी नाम दिन्ह येथे झालेल्या मागील सामन्यात संघाने व्हिएतनामशी 1-1 अशी बरोबरी साधली होती. भारतीय संघाला आज सोमवारी सकारात्मक निकाल न मिळाल्यास 11 सामन्यांत एकही विजय नोंदवता न येता त्यांच्यासाठी या वर्षाची समाप्ती होईल. कारण पुढील वर्षी मार्चमध्ये होणार असलेल्या आशियाई चषक पात्रता फेरीपूर्वी हा सामना भारतासाठी शेवटचा ठरू शकतो.
भारत-मलेशिया फुटबॉल लढतींना बराच मोठा इतिहास लाभलेला आहे. 1957 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या मैत्रिपूर्ण सामन्यात भारताने 3-0 ने विजय मिळविला होता. त्या पहिल्या लढतीपासून गेल्या वर्षीच्या मर्डेका स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत या दोन्ही संघांनी 32 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. मर्डेका स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाने 4-2 असा विजय नोंदविला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविऊद्ध इतके सामने खेळलेला नाही. त्यानंतर पाकिस्तान (29 सामने) आणि बांगलादेश (28 सामने) यांचा क्रमांक लागतो.