तिस्ता पाणीप्रश्नी तोडगा लवकर हवा!
बांगलादेश अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांची सूचना
वृत्तसंस्था / ढाका
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिस्ता नदी पाणीवाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी सूचना बांगलादेश अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांनी केली आहे. वर्षानुवर्षे हे प्रकरण प्रलंबित ठेवल्याने काहीच साध्य होणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले. भारताने अद्याप त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा प्रश्न गेली पाच दशके प्रलंबित आहे.
हा प्रश्न आंतरराष्ट्रीय नियमांच्या आणि प्रथांच्या अनुसार सोडविला गेला पाहिजे. तिस्ता नदीच्या खालच्या भागात बांगलादेश येत असल्याने त्याला काही विशेष अधिकार आहेत, असे त्यांनी सूचित केले. आम्ही यासाठी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार नाही. तथापि, हा प्रश्न लवकरात लवकर सुटणे हे दोन्ही देशांसाठी लाभदायक आहे, असे प्रतिपादन त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले. भारत आणि बांगलादेश यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडविला पाहिजे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
2011 ला प्रयत्न फसला
2011 मध्ये मनमोहनसिंग यांच्या ढाका दौऱ्यात या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी दोन्ही देश पाणीवाटपाच्या एका करारावर स्वाक्षऱ्या करणार होते. तथापि, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तो करार मान्य केला नव्हता. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. नंतरच्या काळातही असे प्रयत्न करण्यात आले पण निश्चित तोडगा काढला गेला नाही.
पुराचा प्रश्न
भारताने आपल्या धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडल्याने बांगलादेशात महापुराची स्थिती निर्माण झाली असा आरोप त्या देशातील काहींनी केला होता. त्यावरही युनुस यांनी त्यांचे मत व्यक्त केले. भारत आणि बांगलादेश यांच्यात पाणीप्रश्न व्यापक करार होत नाही, तो पर्यंत हा प्रश्न मानवी मूल्यांना आधार मानून हाताळावा लागणार आहे, अशी मांडणी त्यांनी केली.