बांगलादेश सैन्यात दुफळीचे संकेत
सैन्यप्रमुख वकार-उज-जमान यांच्या पदाला धोका : अवामी लीग समर्थक अन् कट्टरवादमसर्थक आमने-सामने
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात सद्यकाळात सर्वात शक्तिशाली संस्था असलेल्या बांगलादेशी सैन्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सैन्यामध्ये विभाजनाची स्थिती निर्माण होत असून यात तीन शक्तिकेंद्रे उदयास येत आहेत. यातील प्रत्येक शक्तिकेंद्राचे नेतृत्व सैन्याचा एक जनरल करू शकतो. बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यावर फैलावलेली राजकीय अस्थिरता आणि अराजकतेमुळे देशाला वाचविण्यासाठी सैन्याकडे आशेने पाहिले जात होते, परंतु आता सैन्यच संकटात सापडले आहे. बांगलादेशी सैन्यात तीन शक्तिकेंद्रे निर्माण झाल्याने अवघड स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. अद्याप पूर्णपणे संकटाची स्थिती दिसून येत नसली तरीही अवामी लीग समर्थक आणि इस्लामिक गटांचा प्रभाव असलेल्या जनरल्सदरम्यान वर्चस्वाच्या चढाओढीवरून सैन्याला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
अवामी लीग समर्थक सक्रीय
बांगलादेश सैन्याचे वर्तमान प्रमुख वकार-उज-जमान हे मध्यममार्गी सैन्याधिकारी म्हणून ओळखले जातात आणि सद्यकाळात सैन्यावर त्यांचे नियंत्रण आहे. परंतु सैन्यात दोन नवी शक्तिकेंद्रे उदयास आली आहेत. सैन्यामध्ये एका शक्तिकेंद्राचे नेतृत्व जनरल मोहम्मद शाहीनुल हक करत आहेत. त्यांना बांगलादेश सैन्याच्या नवव्या डिव्हिजनचे अवामी लीग समर्थक मेजर जनरल मोहम्मद मोइन खान यांचे समर्थन प्राप्त आहे. याला बांगलादेशातील सर्वात शक्तिशाली डिव्हिजन मानले जाते. लेफ्टनंट जनरल हक विजय दिन परेड 2002 चे परेड कमांडर होते आणि यापूर्वी सैन्य मुख्यालयात चीफ ऑफ जनरल स्टाफ होते. त्यांनी सैन्याचे मुख्यालय, जनरल स्टाफ ब्रँचमध्ये शस्त्रास्त्र, उपकरण आणि सांख्यिकी संचालनालयात संचालक म्हणूनही सेवा बजावली आहे.
फैजुर रहमानना कट्टरवाद्यांची साथ
सैन्याच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल मोहम्मद फैजुर रहमान करत आहेत. मोहम्मद फैजुर हे हिजबुत तहरीरशी निगडित मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम समवेत विद्यार्थी नेत्यांच्या संपर्कात आहेत. रहमान यांनी यापूर्वी बांगलादेशी सैन्याची गुप्तचर यंत्रणा डीजीएफआयचे प्रमुख काम केले आहे.