जरांगे- पाटलांच्या आरोग्यासाठी तिऱ्हे ग्रामदैवताला दंडवत; ग्रामस्थांनी घेतली नेत्यांच्या विरोधात सामूहिक प्रतिज्ञा
मराठा समाजास आरक्षणाची मागणी करत राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनास यश यावे व प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी,यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे गावच्या समस्त मराठा समाज बांधवांनी आज ग्रामदैवत म्हसोबाला दंडवत घालून मनोज जरांगे यांच्या आरोग्यासाठी साकडे घातले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे. मात्र,सरकारकडून मराठा आंदोलनाची सकारात्मक दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. पाटील यांना अशक्तपणा आल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. याच पारश्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत आंदोलन सुरू करणाऱ्या तिऱ्हे येथील मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या स्वास्थ्यासाठी देवाकडे साकडे घातले आहे.
ग्रामदैवत म्हसोबाला मराठ्यांचा दंडवत
जरांगे पाटील यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, तसेच त्यांना या आरक्षण आंदोलनाच्या लढ्यात यश मिळावे, यासाठी तिऱ्हे येथील आंदोलक मराठा समाजबांधवांनी आज ग्रामदैवत म्हसोबाला दंडवत घातले. मराठा आंदोलकांनी आंदोलन स्थळापासून म्हसोबा मंदिरापर्यंत दंडवत घातला. यावेळी जरांगे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश यावे असे साकडे देवाकडे घालण्यात आले.
आरक्षणासाठी प्रतिज्ञा आणि जोरदार घोषणाबाजी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. तिऱ्हे येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी आज आरक्षणाची मागणी कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात येऊ न देण्याची, तसेच कोणत्याही पुढाऱ्याच्या कार्यक्रमास न जाण्याची आणि कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून समर्थन न करण्याची सर्वांनी म्हसोबा मंदिरा समोर शपथ घेत प्रतिज्ञा केली आहे.यावेळी मराठा बांधवांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, सध्या आंदोलन शांततेत सुरू आहे. तोवरच सरकारने तत्काळ दखल घेऊन आरक्षणावर तोडगा काढवा अन्यथा मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे, लागेल असा इशारा मराठा समाजबांधवांनी दिला.