कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने संपवली जीवनयात्रा; जत तालुक्यातील उमदी येथील घटना
उमदी,वार्ताहर
जत तालुक्यातील उमदी येथील शेतकऱ्याने बॅंक व सावकारी कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. नागप्पा मदगोंडा पडनुरे वय-४९ असे शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागप्पा मदगोंडा पडनुरे यांचे उमदी ते अंकलगी दरम्यान शेत आहे. द्राक्षबागेच्या उभारणीसाठी त्यांनी बँकेमार्फत व काही खाजगी सावकारांकडून कर्ज काढले होते.
दरम्यान, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पन्न घटले होते. शिवाय त्यांच्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले होते. अशातच बेदाण्याचा दर गडगडल्याने पडनूर यांचे शेतीचे आणि जगण्याचे आर्थिक गणित कोलमडले होते. अलीकडे ते प्रचंड नैराश्य जीवन जगत होते.
त्यात शेती उभारणीसाठी घेतलेल्या कर्जसाठी खाजगी सावकार व बँकेचे लोकांनी ते भरण्यासाठी सतत तगादा लावला होता. परुंतु नागाप्पा यांची कर्ज परतफेड करण्याची कुवत राहीली नसल्याने त्यांनी गुरुवारी दुपारी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत उमदी पोलीसांत नोंद झाली आहे.