आत्महत्या प्रकरणे हाताळणाऱ्यावरच स्वत:ही आत्महत्या करण्याची वेळ!
रुद्रण्णा यडवण्णावर आत्महत्या प्रकरणी तपासाला गती
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकारी रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) आत्महत्या प्रकरणी तपास सुरू आहे. याप्रकरणी तहसीलदारांसह तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी खडेबाजार पोलीस स्थानकाला भेट देऊन बुधवारी सायंकाळी या घटनेसंबंधीच्या तपासाची माहिती घेतली. मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी रुद्रण्णा याने तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. यासंबंधी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू, अशोक कब्बलगेर या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खडेबाजार पोलिसांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन काही कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुद्रण्णा यडवण्णावर यांच्यावर तहसीलदार कार्यालयात आधीपासूनच एक महत्त्वाची जबाबदारी होती. विष पिऊन किंवा पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची मृत्यूपूर्व जबानी घेण्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून ते पार पाडत होते. यासाठी रात्री-अपरात्री सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन मृत्युशय्येवर असणाऱ्यांची जबानी घेत होते. खासकरून सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलांची जबानी घेऊन तहसीलदारांना पाठविण्याचे काम ते करीत होते. तहसीलदार कार्यालयातील भ्रष्ट व्यवस्थेमुळे स्वत: रुद्रण्णा यांच्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यूपूर्व जबानी घेण्यासाठी पोलीस दलाकडून तहसीलदारांना विनंतीअर्ज देण्यात येतो. त्यानंतर रुद्रण्णा स्वत: सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन मृत्युशय्येवर असणाऱ्यांची जबानी घेत होते. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात अनेक आत्महत्या प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकाऱ्यावर तहसीलदार कार्यालयात आत्महत्या करण्याची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 7.31 वाजण्याच्या सुमारास आपल्या मृत्यूला तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू व अशोक कब्बलगेर हेच जबाबदार असल्याचे संदेश रुद्रण्णाने तहसीलदार बेळगाव ऑफिस ऑल स्टाफ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवल्यानंतर लगेच तहसीलदार बसवराज नागराळ यांनी रुद्रण्णाला ग्रुपमधूनच काढून टाकले आहे. या अधिकाऱ्यांनी त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. दरम्यान, बुधवारी रात्री रुद्रण्णाची पत्नी व आई यांच्याकडून खडेबाजार पोलीस स्थानकात एकंदर घटनेसंबंधी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे.