आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल ताब्यात
बेळगाव : मंगळवारी सकाळी तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल फोन खडेबाजार पोलिसांनी जप्त केला आहे. बुधवारी फोन ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी निर्माण झालेले संशय लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत. रुद्रण्णा दुंडाप्पा यडवण्णवर (वय 34 मूळचा रा. मुगळखोड, ता. रायबाग, सध्या रा. आंबेडकरनगर-सदाशिवनगर) या तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेवरून राजकीय पक्षांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस आधी रुद्रण्णाने आपल्या मृत्यूला तहसीलदारासह तिघेजण जबाबदार आहेत, असा संदेश व्हॉटसअप ग्रुपवर पाठविला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी रुद्रण्णाचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. तो फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.