विद्यार्थ्यांअभावी पदवीपूर्व कॉलेज बंद करण्याची वेळ
बेळगाव : विद्यार्थी प्रवेश घेत नसल्यामुळे पदवीपूर्व महाविद्यालये बंद होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली स्पर्धा आणि शहरी भागाकडे विद्यार्थ्यांचा असलेला ओढा यामुळे ग्रामीण भागातील पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड येथे तर यावर्षी एकही प्रवेश झाला नसल्याने कॉलेज बंद करण्याची वेळ आली आहे. 2006-07 मध्ये सायन्स, आर्ट्स व कॉमर्स या तीनही विभागात बैलवाड येथे कॉलेज सुरू करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. परंतु, हळूहळू ती कमी होत गेली. काही वर्षांपूर्वी कॉमर्स विभाग विद्यार्थ्यांअभावी बंद करावा लागला.
त्यामुळे बैलवाड व आसपासच्या गावांतील विद्यार्थी सायन्स व आर्ट्स विभागात प्रवेश घेत होते. परंतु, 2024-25 मध्ये प्रथम वर्ष पीयूसीला अद्याप एकही प्रवेश झालेला नाही. दुसऱ्या वर्षात विज्ञान शाखेत 14 तर कला शाखेत 11 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विषयानुरुप प्राध्यापकांची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागातील पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. शहरात मात्र प्रत्येक विषयाला स्वतंत्र प्राध्यापक, सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने तसेच बसचा मोफत प्रवास असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा शहरी भागातील कॉलेजकडे आहे. बैलहोंगल शहर बैलवाडपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. परंतु, इतरही कॉलेजमध्ये हीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे.