नगरसेवकांवर उद्याने स्वच्छता करण्याची वेळ
मनपाच्या दुर्लक्षामुळे उद्यानांची दुरवस्था
बेळगाव : अनेकवेळा तक्रार करूनदेखील महापालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये स्वच्छता केली जात नसल्याने अखेर नगरसेवकानेच स्वच्छता करून महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार नियुक्त नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी माळमारुती येथील प्रगती उद्यानात मशीनद्वारे रान काढून उद्यान नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. नुकताच झालेल्या विकास आढावा बैठकीत दिनेश नाशीपुडी यांनी उद्यान स्वच्छतेचा मुद्दा मांडला होता. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील स्वच्छतेबाबत दखल घेतली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पुढील पंधरा दिवसात उद्याने स्वच्छ केली जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्याप स्वच्छता करण्यात आलेली नाही. पावसामुळे उद्यानांमध्ये भरमसाट रान वाढले आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली उद्याने वापराविना पडून आहेत. त्यामुळे रान काढल्यास उद्यानांचा वापर केला जाऊ शकतो. अशी मागणी त्यांनी केली होती. अखेर दिनेश नाशीपुडी यांनी स्वत:च मशीनद्वारे रान काढून उद्यान स्वच्छ करून दिले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरसेवकांनाच उद्याने स्वच्छ करावी लागत असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.