खानापूर-जांबोटी मार्गावरील अवजड वाहनांना वेळेचे बंधन
रात्री 8 नंतर अवजड वाहतूक पूर्णपणे बंदचा आदेश
बेळगाव : पिरनवाडीहून जांबोटीला जाणाऱ्या रोडवरील कुसमळी पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घातली असून खानापूरहून जांबोटीकडे जाणाऱ्या वाहनांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. रात्री 8 नंतर या मार्गावर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे. सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी केला असून कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पूल 99 वर्षांचा आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे. पूल शिथिल अवस्थेत असल्यामुळे अवजड वाहतूक बंदीचा आदेश जारी केला आहे.
याबरोबरच खानापूरहून जांबोटीला ये-जा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ ठरवून दिली आहे. हा मार्ग पूर्णपणे वनविभागात आहे. त्यामुळे या मार्गावर पावसामुळे माती खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही बाजूने वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून या मार्गावर एकेरी वाहतूक लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. खानापूरहून जांबोटीला जाणाऱ्या अवजड वाहनांना स. 6 ते दु. 1 पर्यंत वाहतुकीची मुभा आहे. तर जांबोटीहून खानापूरकडे होणारी अवजड वाहतूक दु. 1 ते रात्री 8 पर्यंत आहे. बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून रात्री 8 नंतर या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.