मान्सूनपूर्व पावसामुळे मशागतीची कामे ठप्प
वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतशिवारात अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. तर काही शिवारांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे खरीप हंगामातील मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मे महिना संपत आला तरीही शेत शिवारांमध्ये धूळवाफ पेरणी करण्यात आलेली नाही. मान्सूनपूर्व पाऊस अधिकच जोर घेत आहे. रविवारी सकाळी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आता शिवारात पेरणी करायची कशी, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. यामध्ये खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. खरीप हंगामात भात, बटाटा, रताळी, भुईमूग, नाचणी आदी पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. या पिकांसाठी शिवारात मशागतीची कामे करण्यात आलेली आहेत. उर्वरित मशागतीची कामे करून बळीराजा भातपेरणीला सुरुवात करणारच होता. याच कालावधीत मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे व भातपेरणी पूर्णपणे ठप्प झाली आहेत. पावसामुळे तालुक्याच्या काही भागातील नदी व नाल्यांना पाणी आले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आले आहे. यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामानात कमालीचा बदल झाला असून तालुक्यात सर्वत्र गारठा निर्माण झाला आहे. हवामानातील बदलामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत.