ठळकवाडी, ज्ञान प्रबोधन संघ विजयी
हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्टस क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ठळकवाडी संघाने शांतीनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा तर ज्ञान प्रबोधन संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. मयूर जाधव ठळकवाडी, सुजल गोरल ज्ञान प्रबोधन यांन सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटीनियम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 117 धावा केल्या. त्यात प्रज्योत उघाडेने 3 चौकारांसह 29, पुनीत मेत्री व वीराज बी यांनी 2 चौकारांसह प्रत्येकी 25 तर श्री हुंदरेने 13 धावा केल्या. खानापूरतर्फे राम अलाबादीने 15 धावात 2, कुशल व समर्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना शांतीनिकेतन खानापूरने 20 षटकात 6 गडी बाद 98 धावा केल्या. त्यात सोहम गावडेने 5 चौकारांसह 40 तर राम अलाबादीने 13 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे मयूर जाधवने 13 धावात 3, प्रज्योत उघाडे व वीराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात ज्ञान प्रबोधन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 175 धावा केल्या. त्यात सुजल गोरलने 11 चौकारांसह 86, आयुष अणवेकरने 5 चौकारांसह 64 तर मंथन शर्माने 10 धावा केल्या. केएलईतर्फे सिद्धार्थ व श्रीकांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई संघाने 20 षटकात 9 गडी बाद 94 धावा केल्या. त्यात ओजस गडकरीने 3 चौकारांसह 42, हर्षिद बे ने 5 चौकारांसह 24 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे अध्वेद भटने 22 धावात 5, सुजल गोरलने 18 धावात 3 तर पियुशने 1 गडी बाद केला.