तिलक वर्माचे सलग तिसरे शतक
वृत्तसंस्था / राजकोट
येथे सुरू झालेल्या 2024 च्या सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील हैद्राबाद संघाकडून खेळताना भारताचा आक्रमक फलंदाज तिलक वर्माने मेघालय विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकविले. या सामन्यात तिलक वर्माने 67 चेंडूत 10 षटकार आणि 14 चौकारांसह 151 धावा झोडपल्या. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात सलग तीन शतके झळकविणारा तिलक वर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे.
तिलक वर्माने अलिकडेच झालेल्या द. आफ्रिकाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील सामन्यात सलग दोन शतके यापूर्वी नोंदविली होती. क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारातील वर्माचे हे तिसरे शतक आहे. 2007 साली सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेला प्रारंभ झाला होता. 22 वर्षीय तिलक वर्माने अलिकडच्या कालावधीत टी-20 च्या चार सामन्यात 140 धावांच्या सरासरीने 280 धावा जमविल्या आहेत. महिलांच्या क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या किरण नेवगेरीने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात 162 धावांची खेळी केली होती. मेघालय विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने संघमाच्या 3 षटकामध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 50 धावा झोडपल्या. आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन संघाने तिलक वर्माला यावेळीही कायम राखले आहे.