इंडिया अ संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ओमान मस्कतमध्ये 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 आशिया चषक इमर्जिंग संघातील स्पर्धेसाठी इंडिया अ संघाचे नेतृत्व मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज तिलक वर्माकडे सोपविण्यात आला आहे. अभिषेक शर्मा या संघाचा उपकर्णधार म्हणून राहिल.
21 वर्षीय तिलक वर्माने आतापर्यंत 4 वनडे आणि 16 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून अभिषेक शर्माने 8 टी-20 सामन्यात आपला सहभाग दर्शविला आहे. मस्कतमधील या आगामी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात फिरकी गोलंदाज राहुल चहर, प्रभसिमरनसिंग, अनुज रावत, आयुष बडोनी, रमनदीप सिंग, नेहाल वधेरा यांचा समावेश आहे. वैभव अरोरा, साई किशोर, ऋतिक शोकीन, रसीख सलाम, अकिब खान यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल. या स्पर्धेमध्ये इंडिया अ संघाचा ब गटात समावेश आहे. इंडिया अ संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 19 ऑक्टोबरला पाक बरोबर होणार आहे. या गटात ओमान आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांचा समावेश असून अ गटात अफगाण अ, बांगलादेश अ, हाँगकाँग आणि श्रीलंका अ यांचा सहभाग राहिल. सदर स्पर्धा पहिल्यांदाज टी-20 धर्तीवर खेळविली जात आहे. यापूर्वी पाचवेळा ही स्पर्धा वनडे प्रकारात झाली होती.
इंडिया अ संघ: तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, निशांत सिंधू, रमनदीप सिंग, नेहाल वधेरा, आयुष बडोनी, अनुज रावत, साई किशोर, ऋतिक शोकिन, राहुल चहर, वैभव अरोरा, अनशुल कंबोज, अकिब खान, रसिक सलाम.