तिलक वर्माची दुसऱ्या स्थानावर झेप, चक्रवर्ती टॉप पाचमध्ये
आयसीसी टी-20 मानांकन : कसोटी गोलंदाजांत बुमराह अग्रस्थानी कायम
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा प्रतिभावान फलंदाज तिलक वर्माने आयसीसी टी-20 मानांकनात दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे तर गूढ स्पिनर वरुण चक्रवर्तीने एकदम 25 स्थानांची झेप घेत टॉप पाचमध्ये स्थान मिळविले आहे.
टी-20 फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या टॅव्हिस हेडनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून ट्रॅव्हिसने 23 गुणांची आघाडी राखली आहे. डावखुरा तिलक वर्माने जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांत नाबाद 19, नाबाद 72 व 18 धावा जमविल्या. या मालिकेतील अजून दोन सामने बाकी असल्याने तिलक वर्माला ट्रॅव्हिसला मागे टाकण्याची संधी आहे. तसे झाल्यास पाकच्या बाबर आझमनंतर अव्वल स्थान पटकावणारा तो सर्वात युवा फलंदाज होईल. बाबर आझमच्या नावावर सध्या हा विक्रम असून 23 वर्षे 105 दिवसांचा असताना त्याने या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.
वर्माचे सध्या 832 रेटिंग गुण झाले असून टी-20 क्रिकेटच्या इतिहासात इतके गुण मिळविणारा तो भारताचा चौथा फलंदाज बनला आहे. याआधी सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएल राहुल यांनी सर्वोच्च रेटिंग गुण मिळविले होते. अभिषेक शर्मानेही बढती मिळविली आहे. त्याने एकदम 59 स्थानांची उडी घेत 40 वे स्थान घेतले आहे इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन पाच स्थानांची प्रगती करीत 32 व्या, बेन डकेट 28 स्थानांची प्रगती करीत 68 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
चक्रवर्ती टॉप पाचमध्ये
गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या टी-20 मध्ये 24 धावांत 5 बळी मिळविले तर भारताला हा सामना गमवावा लागला. या कामगिरीने तो अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे. त्याचा सहकारी अक्षर पटेलनेही पाच स्थानांची बढती मिळवित टॉप टेनच्या जवळ मजल मारली आहे. तो आता 11 व्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या आदिल रशिदने पुन्हा एकदा अग्रस्थान पटकावले आहे. यापूर्वी 2023 च्या अखेरीस त्याने हे स्थान पटकावले होते आणि बराच काळ त्याने हे स्थान कायम राखले होते. नाताळ सणाच्या आधी विंडीजच्या अकील हुसेनने त्याला काही काळ बाजूला सारले हेते.
कसोटी मानांकनात बुमराहचे वर्चस्व
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत त्याने वर्चस्व गाजवत आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमानही पटकावले आहे. कसोटी अष्टपैलूंमध्ये विंडीजच्या जोमेल वारिकनने 24 व्या स्थानावर झेप घेतली आहे तर पाकच्या मोहम्मद रिझवानने दोन स्थानांची प्रगती करीत कसोटी फलंदाजांत 15 वे स्थान मिळविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या जो रूटने अग्रस्थान कायम राखले आहे.