महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करा!
मुख्यमंत्र्यांची सूचना : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्ह्यातील जलाशये, विमानतळ व सुवर्णविधानसौधची सुरक्षा वाढवण्याचीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आहे.
शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख व पोलीस आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्र्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, ग्रामीण विकासमंत्री प्रियांक खर्गे, मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांच्यासह अनेक नेते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, दोन दिवसांत मॉक ड्रिल सुरू करण्यात येणार आहे. प्रमुख ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून सायरन बसविण्यात येणार आहेत. बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या कारवारमध्ये कैगा अणु प्रकल्प आहे. याबरोबरच नौदलाचे तळही आहे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. एक-दोन दिवसात पोलीस, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या सहकार्याने मॉक ड्रिलला सुरुवात करण्यात येणार आहे. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही सद्यपरिस्थितीची जाणीव करून देऊन जागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, प्रमुख जलाशये, सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्कासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थितीविषयी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या चौदा पोस्ट डिलिट करण्यास भाग पाडण्यात आले आहे.
गॅस रिफिलिंग करणारी ठिकाणे व प्रमुख कारखाने आदी ठिकाणीही बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. खासकरून संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरातील लष्करी तळ, पेट्रोल बंकर्स आदींचीही यादी बंदोबस्तासाठी बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.