व्याघ्रक्षेत्र अहवाल चुकीचा
मंत्री सुभाष फळदेसाई यांची संतप्त प्रतिक्रिया
पणजी : गोव्यातील काही भाग व प्रामुख्याने आपल्या मतदारसंघातील गावे व्याघ्रक्षेत्र राखीव (टारगर रिझर्व) करण्यास विरोध असून केंद्रीय सक्षम समितीने (सीईसी) राखीवतेच्या बाजूने दिलेला अहवाल चुकीचा आहे. तो आपणास मान्य नाही. आपण कधी तेथे वाघ बघितलाच नाही आणि सीईसी म्हणजे कोणी देव नाही, अशी प्रतिक्रिया समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीने व्याघ्रक्षेत्र राखीव करण्याच्या बाजूने आणि गोवा सरकारच्या विरोधात अहवाल दिला असून त्याबाबत छेडले असता फळदेसाई पुढे म्हणाले की, व्याघ्रक्षेत्राच्या नावाखाली आपण आपल्या मतदारसंघातील गावे, ग्रामस्थ आणि त्यांची घरे विस्थापित होऊ देणार नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी चालेल तसेच कोठडीत जावे लागले तरी त्याची पर्वा नाही. आपल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही फळदेसाई यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार
पाच घरे जरी विस्थापित होत असतील तरी आपण त्यास विरोध करणार असून त्या सीईसी अहवालास पाठिंबा देणार नाही, कायदेशीर मार्ग पडताळून पहाणार असून वाघ नसताना सीईसी चुकीचा अहवाल कसा काय देऊ शकते ? असा प्रतिसवाल फळदेसाई यांनी केला आहे. या विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार असून विरोधापासून आपण हटणार नसल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.