For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात दोन ठिकाणी कोसळली वीज ! सुदैवाने जीवितहानी नाही; मुसळधार पावसाने झोडपले

02:15 PM Sep 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
शहरात दोन ठिकाणी कोसळली वीज   सुदैवाने जीवितहानी नाही  मुसळधार पावसाने झोडपले
Thunderbolt fell in Kolhapur
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहराला सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. भवानी मंडपातील एका शाळेच्या इमारतीसह शिवाजी पेठेतील संध्यामठ परिसरातील इमारतीवर दुपारी वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

मान्सूनच्या पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दिवसभर उकाडा, सायंकाळच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी अन् रात्री थंडी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव कोल्हापूरकर घेत आहेत. मागील दोन दिवसांपासून तर वातावरणात अचानक बदल होत आहे. कडाक्याचे उन्ह अन् अचानक पाऊस येत आहे. सोमवारी सकाळी पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत कडक उन्हाच्या झळा बसत होत्या. तापमानात कमालीची वाढ झाली होती. एक वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले अन् जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासभर मुसळधार पावसाने शहरासह परिसरातील भागाला झोडपून काढले. जिह्याच्या पश्चिम भागात मुसळधार सरी कोसळल्या. तासाभराच्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. तासाभरानंतर शहर परिसरात विजांचा जोरदार कडकडाट सुरू झाला. यामुळे शहरवासीयांचा थरकाप उडाला. भवानी मंडप येथील एका शाळेच्या इमारतीवर वीज पडली. विजेच्या जोरदार धक्क्याने इमारतीच्या गच्चीवरील भिंतीचा काही भाग कोसळला. तसेच काही भागाला भेगा पडल्या. विजेच्या धक्क्याने पाण्याच्या टाकीतील पाणी उसळून बाहेर आले. याचवेळी शिवाजी पेठेतील एका इमारतीवरही वीज पडल्याचा आवाज झाला. दोन्ही ठिकाणी सुदैवाने जीवित तसेच वित्तहानी टळली. वीज पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आपत्ती निवारण विभागासह अग्निशमन यंत्रणाही वीज पडल्याच्या घटनेने सतर्क झाली. पुढील दोन आठवडे जिह्यात अशाच प्रकारे पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.