युपी वॉरियर्सचा दिल्लीवर थरारक विजय
अष्टपैलू दीप्ती शर्मा सामनावीर : दिल्लीचा केवळ एका धावेने पराभव, लॅनिंगचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सामनावीर दीप्ती शर्मा आणि ग्रेस हॅरिस यांच्या शेवटच्या दोन षटकातील झालेल्या चमत्काराने युपी वॉरियर्सने बलाढ्या दिल्ली कॅपिटल्सचा एक चेंडू बाकी ठेऊन एका धावेने थरारक विजय मिळविला. 48 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 59 धावा तसेच 19 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या युपी वॉरियर्सच्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग ऑरेंज कॅपची मानकरी ठरली असून तिने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 261 धावा जमविल्या आहेत.
शुक्रवारच्या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 19.5 षटकात 137 धावात आटोपला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 19 व्या षटकात 3 गडी बाद झाले. तर 20 व्या षटकात त्यांचे आणखी 3 गडी बाद झाल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. शेवटच्या दोन षटकांत त्यांनी 6 बळी गमविले. दिल्लीला शेवटच्या चार षटकांत 28 धावा करायच्या होत्या. पण दीप्ती व हॅरिस यांनी त्यांना 26 धावांवर रोखत वॉरियर्सने केवळ एका धावेने थरारक विजय मिळविला.
युपी वॉरियर्सच्या डावात कर्णधार हिलीने 30 चेंडूत 5 चौकारांसह 29, दीप्ती शर्माने 48 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 59, ग्रेस हॅरिसने 12 चेंडूत 1 चौकारासह 14, इक्लेस्टोनने 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 44 धावा जमविताना 1 गडी गमाविला. युपी वॉरियर्सचे अर्धशतक 48 चेंडूत, शतक 87 चेंडूत फलकावर लागले. हिली आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागिदारी केली. दिल्ली कॅपिटल्सतर्फे तितास साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिखा पांडे, अरुंधती रे•ाr, जोनासेन आणि कॅप्से यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला कर्णधार लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी 22 चेंडूत 22 धावांची भागिदारी केली. सायमा ठाकुरने शेफाली वर्माचा त्रिफळा उडविला. तिने 12 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा केल्या. लॅनिंग आणि कॅप्से यांनी दुसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. दीप्ती शर्माने कर्णधार लॅनिंगला पायचीत केले. लॅनिंगने 46 चेंडूत 12 चौकारांसह 60 धावा जमविल्या. ठाकुरने रॉड्रीग्जला झेलबाद केले. तिने 1 षटकारासह 17 धावा जमविल्या. इक्लेस्टोनने कॅप्सेला झेलबाद केले. तिने 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. रॉड्रीग्ज बाद झाली त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सची स्थिती 17.1 षटकात 4 बाद 112 अशी होती. विजयासाठी त्यांना आणखी 26 धावांची गरज होती. पण डावातील शेवटच्या 2 षटकांमध्ये सामन्याला कलाटणी मिळाली. डावातील 19 वे षटक दीप्ती शर्माने टाकले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर सदरलँडचा त्रिफळा उडाला. तिने 6 धावा जमविल्या. यानंतर दीप्तीने दुसऱ्या चेंडूवर अरुंधती रे•ाrला खाते उघडण्यापूर्वीच हॅरिसकरवी झेलबाद केले. दीप्तीने या षटकातील आपल्या चौथ्या चेंडूवर शिखा पांडेला टिपले. तिने 4 धावा जमविल्या. 19 व्या षटकाअखेर दिल्ली कॅपिटल्सने 7 बाद 128 धावा जमविल्या होत्या. डावातील शेवटचे षटक ग्रेस हॅरिसने टाकले. या षटकात दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमविले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हॅरिसने राधा यादवचा 9 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर जोनासेन धावचीत झाली. तिने 5 चेंडूत 1 षटकार, 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. हॅरिसने या षटकातील पाचव्या चेंडूवर तितास साधूला बदली खेळाडू वॅटकरवी झेलबाद केल्याने युपी वॉरियर्सने हा सामना केवळ एका धावेने आणि एक चेंडू बाकी ठेऊन जिंकला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.
दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 35 धावा जमविताना 1 गडी गमाविला. त्यांचे अर्धशतक 51 चेंडूत तर शतक 90 चेंडूत फलकावर लागले. लॅनिंगने 11 चौकारांसह 38 चेंडूत अर्धशतक झळकाविले. युपी वॉरियर्सतर्फे दीप्ती शर्माने 19 धावात 4, सुल्ताना आणि हॅरिस यांनी प्रत्येकी 2 तर इक्लेस्टोनने 1 गडी बाद केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 गुणासह पहिले स्थान मिळविले असून मुंबई इंडियन्स 8 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आज शनिवारी मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक - युपी वॉरियर्स 20 षटकात 8 बाद 138 (दीप्ती शर्मा 59, हिली 29, हॅरिस 14, अवांतर 9, राधा यादव, तितास साधू प्रत्येकी 2 बळी, शिखा पांडे, अरुंधती रे•ाr, जोनासेन आणि कॅप्से प्रत्येकी 1 बळी), दिल्ली कॅपिटल्स 19.5 षटकात सर्व बाद 137 (मेग लॅनिंग 60, शेफाली वर्मा 15, कॅप्से 15, रॉड्रिग्ज 17, जोनासेन 11, राधा यादव 9, दीप्ती शर्मा 4-19, सायमा ठाकुर 2-30, ग्रेस हॅरिस 2-8, इक्लेस्टोन 1-15).