मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय
दिल्लीवर 4 गड्यांनी मात, यास्तिका, हरमनप्रीतची अर्धशतके, सजनाचा विजयी षटकार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
दुसऱ्या महिला प्रिमियर लीगची सुरुवात अतिशय रोमांचक पद्धतीने झाली असून शेवटच्या चेंडूवर निकाली ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 4 गड्यांनी विजय मिळविला. यास्तिका भाटिया व सामनावीरची मानकरी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी अर्धशतके नोंदवली. अॅलीस कॅप्सेची अष्टपैलू कामगिरी मात्र वाया गेली. सजना सजीवनकडून मात्र ऐतिहासिक कामगिरी नोंदवली गेली. तिचा हा पदार्पणाचा सामना होता आणि केवळ एकच चेंडू खेळावयास मिळाला आणि त्यावर तिने विजयी षटकार ठोकत संस्मरणीय कामगिरी केली. आज शनिवारी आरसीबी व यूपी वॉरियर्स महिला संघांची लढत सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 बाद 171 धावा जमविल्या. कॅप्सेने शानदार अर्धशतक नोंदवले तर जेमिमाने 42 धावा फटकावल्या. त्यानंतर मुंबईने 20 षटकांत 6 बाद 173 धावा जमवित विजयी सुरुवात केली. यास्तिका भाटियाने 45 चेंडूत 8 चौकार, 2 षटकारांसह 57 धावा फटकावल्या तर हरमनप्रीत 34 चेंडूत 55 धावा काढून शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाली. यावेळी मुंबईला विजयासाठी एका चेंडूत पाच धावांची गरज असताना सजनाने लाँगऑनच्या दिशेने उत्तुंग विजयी षटकार ठोकला. मुंबईच्या डावात अमेलिया केरने 18 चेंडूत 24, नॅट सिव्हर ब्रंटने 17 चेंडूत 19 धावा जमविल्या. दिल्लीच्या अरुंधती रे•ाr व कॅप्से यांनी प्रत्येकी 2, मेरिझेन कॅप व शिखा पांडे यांनी एकेक बळी मिळविले.
थाटात शुभारंभ
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघांचे फ्रांचायजी उपस्थित होते. सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 171 धावा जमविल्या. अॅलीस कॅप्सेने शानदार अर्धशतक (75) तर जेमिमा रॉड्रिग्जने 42 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. तिसऱ्या षटकातील पहिल्याचे चेंडूवर शबनीम इस्माईलने सलामीच्या शेफाली वर्माचा एका धावेवर त्रिफळा उडविला. कर्णधार लेनिंग आणि कॅप्से यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. कर्णधार लेनिंगने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. नॅट् सिव्हर ब्रंटने लेनिंगला संजनाकरवी झेलबाद केले. लेनिंग बाद झाल्यानंतर कॅप्सेला रॉड्रिग्जने चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. कॅप्सेने 53 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 75 धावा झळकाविल्या. रॉड्रिग्जने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 42 धावा जमविल्या. नॅट स्किव्हेर ब्रंटने तिला झेलबाद केले. अॅमेलिया केरने कॅपला भाटियाकरवी यष्टीचीत केले. तिने 9 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. सदरलँड एका धावेवर नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सला अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 6 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 26 धावा जमविताना 1 गडी गमाविला. दिल्ली कॅपिटल्सचे पहिले अर्धशतक 47 चेंडूत तर शतक 84 चेंडूत आणि दिडशतक 110 चेंडूत फलकावर लागले. लेनिंग आणि कॅप्से यांनी दुसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 36 चेंडूत तसेच कॅप्से आणि रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 27 चेंडूत नोंदविली.
संक्षिप्त धावफलक - दिल्ली कॅपिटल्स महिला 20 षटकात 5 बाद 171 (लेनिंग 31, शेफाली वर्मा 1, कॅप्से 75, रॉड्रिग्ज 42, कॅप 16, सदरलँड नाबाद 1, अवांतर 5, नॅट सिव्हर ब्रंट 2-33, अॅमेलिया केर 2-43, इस्माईल 1-24).
मुंबई इंडियन्स महिला 20 षटकांत 6 बाद 173 : हेली मॅथ्यूज 0, यास्तिका भाटिया 45 चेंडूत 57, सिव्हर ब्रंट 17 चेंडूत 19, हरमनप्रीत कौर 34 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 55, अमेलिया केर 18 चेंडूत 3 चौकार, अमनजोत कौर नाबाद 3, सजीवन सजना 1 चेंडूत नाबाद 6, अवांतर 8. गोलंदाजी : कॅप्से 2-23, रे•ाr 2-27, कॅप व शिखा पांडे 1-32.