शेवटच्या चेंडूवर भारताचा रोमांचक विजय
टी-20 मालिका : पहिला सामना जिंकून भारताची आघाडी, सामनावीर सूर्या, इशान यांची अर्धशतके, इंग्लिसचे शतक वाया
भारताने वनडे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा रोमांचक ठरलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 2 गड्यांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. केवळ 42 चेंडूत 80 धावांची आतषबाजी करणाऱ्या व कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादव सामनावीरचा मानकरी ठरला. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी 26 नोव्हेंबर रोजी थिरुवनंतपूरम येथे होणार आहे.
इंग्लिसचे शानदार शतक
जोश इंग्लिसचे दमदार शतक तर स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 बाद 208 धावा जमविल्या. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट या जोडीने संघाच्या डावाला सावध सुरूवात करुन देताना 28 चेंडूत 31 धावांची भागिदारी केली. डावातील पाचव्या षटकात बिश्नोईने शॉर्टचा त्रिफळा उडविला. शॉर्टने 11 चेंडूत 3 चौकारांसह 13 धावा जमविल्या. इंग्लिस आणि स्मिथ या जोडीने भारताच्या नवोदित गोलंदाजांना तुफान फटकेबाजी करत चांगलाच धडा शिकवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना एक गडी गमवला होता. स्मिथ आणि इंग्लिस यांनी दुसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 31 चेंडूत झळकवली. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 43 चेंडूत तर शतक 69 चेंडूत नोंदविले गेले. इंग्लिसने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. त्याने 29 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकवताना स्मिथसमवेत दुसऱ्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 57 चेंडूत नोंदविली. ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा 90 चेंडूत फलकावर लागल्या. स्मिथने 40 चेंडूत 8 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने 11.1 षटकात 130 धावांची भागिदारी केली. 16 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 41 चेंडूत 8 चौकारांसह 52 धावा जमविल्या. स्मिथ बाद झाल्यानंतर इंग्लिसला साथ देण्यासाठी स्टोईनीस मैदानात आला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 9 चेंडूत 19 धावांची भर घातली. इंग्लिसने 47 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांसह आपले दणकेबाज शतक झळकवले. इंग्लिसचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारातील हे पहिले शतक आहे. इंग्लिसने अर्शदिपच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचे फटके मारले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 3 बाद 208 (स्टीव्ह स्मिथ 41 चेंडूत 8 चौकारांसह 52, शॉर्ट 11 चेंडूत 3 चौकारांसह 13, इंग्लिस 50 चेंडूत 8 षटकार आणि 11 चौकारांसह 110, स्टोईनीस नाबाद 7, डेव्हिड 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19, अवांतर 7, प्रसिद्ध कृष्णा 1-50, बिश्नोई 1-54).
भारत 19.5 षटकांत 8 बाद 209 : यशस्वी जैस्वाल 8 चेंडूत 21, इशान किशन 39 चेंडूत 2 चौकार, 5 षटकारांसह 58, सूर्यकुमार 42 चेंडूत 9 चौकार, 4 षटकारांसह 80, तिलक वर्मा 10 चेंडूत 12, रिंकू सिंग 14 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 22, अवांतर 14. गोलंदाजी : तन्वीर सांघा 2-47, बेहरेनडॉर्फ 1-25, शॉर्ट 1-13, अॅबॉट 1-43.