सांगलीत पारंपरिक होड्यांच्या शर्यतीचा थरार...!
सांगली / सचिन ठाणेकर :
श्रावण महिन्याच्या आगमनासह कृष्णानदीच्या प्रवाही पात्रात प्रतिवर्षी पारंपरिक लाकडी होड्यांच्या शर्यतींचा थरार सुरू होतो. आयर्विन पूल ते नवीन पूल दरम्यान या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडतात. तसेच भिलवडी, मिरजसह आसपासच्या गावातही अशा स्पर्धा होतात. नदीकाठी जलक्रीडेचा थरार अनुभवण्यास प्रतिवर्षी नागरिकांची मोठी गर्दी होते. होड्यांच्या लयबद्ध चाली आणि जलप्रवाहाशी स्पर्धा करणाऱ्या संघांची चुरस प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.
होड्यांच्या पारंपरिक शर्यती सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक वर्षांपासून स्थानिक संस्कृतीचा भाग झाल्या आहेत. श्रावण सोमवार, स्वातंत्र्यदिन अशा निमित्ताने प्रतिवर्षी या जलक्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाही सांगलीतील विविध मंडळांच्यावतीने अशा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. गावभागातील केशवनाथ मंडळ प्रतिवर्षी दर पहिल्या श्रावण सोमवारी स्पर्धा घेते. तर यंदा शहरातील संकल्प फौंडेशन गावभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), ओम गणेश मंडळ हरिपूर, सागर व्हनखंडे मिरज, संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठान भिलवडी आदींनी या स्पर्धा घेतल्या आहेत.
प्रत्येक शर्यतीत एकूण १२ ते १५ संघ सहभाग घेतात. प्रत्येक संघात अग्रभागी मार्गदर्शक, मध्यभागी वल्हवणारे चार जण व शेवटी एक सुकाणू असे सहा खेळाडू असतात. स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यांत पार पडते.
विजेत्या संघास रोख पारितोषिक देण्यात येते. शर्यतीसाठी सुमारे १० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणे आवश्यक असते. खेळाडूंचा समन्वय, शारीरिक ताकद, वेग आणि कौशल्याची खरी कसोटी या शर्यतीत लागते. स्पर्धेचा रोमांच वाढवण्यासाठी घाटांवर आणि पुलांवर प्रेक्षकांची गर्दी उसळते. हलगी, घोषणा आणि जल्लोष यांनी संपूर्ण घाट परिसर दुमदुमून जातो. या शर्यतींमुळेसामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला जातो. स्पर्धा आयोजनाचा उद्देश केवळ क्रीडास्पर्धा पुरता मर्यादित न ठेवता, पर्यावरण जनजागृती आणि नदी बचाव चळवळीशीही संलग्न आहे.
नदीचे महत्त्व, स्वच्छता आणि लोकसहभाग याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजक विशेष प्रयत्न करतात. त्यामुळे ही स्पर्धा केवळ जलक्रीडेपुरती मर्यादित रहात नाही, तर ती पर्यावरणप्रेम व संस्कृतीचे एक प्रतीक ठरते. ही शर्यत एक दिवसाची असलीतरी संघ महिना-दीड महिना तयारी करतात. पाण्याचा प्रवाह, खोली आणि वळणांमुळे शर्यतीला एक वेगळाच रोमांचक अनुभव येतो.
सांगलीतील होड्यांच्या या शर्यती केरळच्या प्रसिद्ध चुंदन वल्लम (snake boat race) चीही आठवण करून देतात. मात्र, केरळच्या शर्यती धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाशी जोडलेल्या असल्यातरी सांगलीतील शर्यती स्थानिक सामाजिक समरसता, खेळाची रुची आणि जनजागृती यांचे प्रतीक ठरतात. प्रेक्षकांसाठी हा एक जलमहोत्सव आहे.
नदीच्या प्रवाहात आपली ताकद पणाला लावत खेळाडू शर्यत लढवतात, तेव्हा नागरिक उत्साहाने जलक्रीडेचा आनंद घेतात. या पारंपरिक उपक्रमामुळे नव्यापिढीला नदीचे, परंपरेचे आणि स्थानिक कलेचे महत्त्व पटते, हे विशेष.
यामध्ये सांगलीवाडीचे तरुण मराठा बोट क्लब अ व ब, रॉयल कृष्णा क्लब अ व ब हे संघ कायम अग्रेसर असतात. तसेच वारणामाई क्लब समडोळी, न्यू शानदार बोट क्लब समडोळी, सप्तर्षी क्लब कवठे पिरान, कसबेडिग्रज बोट क्लब, जय मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज यांच्यासह सुखवाडी, भिलवडी, मौजे डिग्रज, पद्माळ, कवठेसार, दुधगाव आदी गावातीलही संघ स्पर्धेत प्रतिवर्षी सहभागी असतात. याशिवाय कोल्हापूरातील अब्दुल लाट व इचलकरंजीचे वरद विनायक क्लब ही सहभागी होतात. या पारंपरिक होड्यांच्या शर्यतींना आता मोठे स्वरूप देऊन अधिक नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित करणे गरजेचे आहे. शासन स्तरावरूनही अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास, स्थानिक पर्यटनाला चालना मिळू शकते. तसेच या स्पर्धेतून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडूही नक्कीच घडू शकतील यात शंका नाही.
सांगली संस्थान काळात आयर्विन पूल होण्यापुर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या होडीवाल्यांच्या स्पर्धा पटवर्धन सरकारने सुरु केल्या. हा साहसी पारंपारिक खेळ आम्ही पुढे जोपासलेला आहे. आता या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आम्ही 'पारंपरिक ते ऑलिम्पिक' हे ब्रीदवाक्य घेऊन रॉयल कृष्णा बोट क्लबच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यातून साहसी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीने आमच्या संस्थेची वाटचाल सुरू आहे.
- प्रताप जामदार, उपाध्यक्ष महाराष्ट्र कयाकिंग अँड कनोइंग असो. सांगली.
होड्यांच्या या पारंपरिक स्पर्धेतूनच रोईंग व कयाकिंग या ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाचा बेसिक किंवा श्रीगणेशा सुरू होतो. खेळाडूचा संयम, साहस आणि समंजस आणि सहनशीलतेचा कस लागतो. येणाऱ्या अडथळ्यावर मात करून पुराच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाविरोधात आपली होडी वलव्हत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी जी कसरत व मेहनत लागते ती अविस्मरणीय असते आणि यातूनच खेळाडूंची निर्णय क्षमता व सहनशीलता तयार होते.
- दत्ता पाटील, आंतर राष्ट्रीय पंच व सहसचिव भारतीय कयाकिंग अँड कनोइंग असो. न्यू दिल्ली.